Saturday, July 27, 2013

20. आम्ही कोण? Aamhi kon?



आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणून काय पुसता? आम्ही असू लाडके-
म्याडमचे, दिधला असे देश तये आम्हास खावावया;
देशी ह्या पैशांबले विचरतो घेऊन तांडा सवे,
दुष्काळीही विधिमंडळात अमुचे चहापान चालू असे..

सारेही पोलीसदळ कसे आम्हापुढे ते झुके
“पाणि”स्पर्शच आमुचा पुरतसे गुंडांना पोसावया!
वाचिवीर अम्ही, सदा करू अशी श्रेष्ठींची चाटुगिरी
बोंबा मारा तुम्ही, अम्ही धरू सदा निष्ठेने जोडे उरी!

मुंबैमाजि वसाहती वसविल्या बांग्लादेशींच्या कुणी?
महागाईच्या अगीत तेल ओतले, बारा रुपड्यांचे कुणी?
ते आम्हीच निलाजरे, घडवितो आदर्शचे घोटाळे!
ते आम्हीच ‘निधर्मी’, दंगल सदा ज्यांच्यामुळे होतसे!!

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील कारागृहे!
आम्हाला वगळा - सुखीच मग हो आम-आदमी चे जिणे!!

Thursday, July 25, 2013

19. मोदींचा व्हिसा आणि भारतीय लोकांची मनोवृत्ती! (modi_visa)

पासष्ठ खासदारांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलंय म्हणे! मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका म्हणून.. बातमी वाचून पोट दुखेपर्यंत हसलो.. पत्र लिहिण्याच कारण काहीही असो पण टिपिकल (हा शब्द वापरण्याचा मोह आवरला नाही) भारतीय मनोवृत्ती ह्यातून दिसून आली.. कोणत्याही गोष्टीवर पाश्चिमात्त्य देशाचा (किंबहुना मुख्यतः अमेरिकेचा) पसंतीचा शिक्का बसला कि ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट शिरोधार्य! अमेरिकेने एखादी गोष्ट मान्य केली कि ती उत्तम किंवा तिचं महत्त्व लोकांना पटतं! बिल गेट्स भारतात येऊन गरीबांना भेटून गेला कि वृत्तपत्रांमधून भारतातील गरिबी, ती हटवण्याचे उपाय ह्यावर चर्चा सुरु होते, अग्रलेख छापून येतात! मुंबईच्या डबेवाल्यांना इंग्लंड मधून बोलावणं आला कि मग लोकांना जाग येते कि ते म्यानेजमेंट गुरु आहेत म्हणून! एखाद्या TED Talk show  मध्ये कोणी सांगितलं कि "Do meditation every day. It helps you to be healthy and happy." कि मग सगळ्यांना त्याच महत्त्व पटणार. पण तेच आपल्या पूर्वजांनी सांगितलय कि रोज देवघरात बसून ध्यानधारणा करा किंवा संध्याकाळी तुळशीसमोर बसून शुभंकरोती म्हणा कि लगेच सगळेजण त्याची मूर्खपणा किंवा अंधश्रद्धा असं म्हणून हेटाळणी करणार! आनंद कर्व्यांना अश्डेन पुरस्कार मिळेपर्यंत कोणाला त्यांच्या संस्थेबद्दल किंवा कामाबद्दल काहीच माहिती नव्हती.. अर्थात आताही खूप जणांना त्याबद्दल माहिती आहे असं नाही.. आज आपल्या इथे असे अनेक लोक आहेत कि जे काहीतरी विधायक करताहेत.. समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी करताहेत.. फारसं कोणी त्यांची दखल घेताना दिसत नाही.. आपली (म्हणजे सुशिक्षित लोकांची) मनोवृत्ती म्हणजे पाश्चिमात्त्य देशातून एखाद्या गोष्टीची दखल घेतली गेली, कि त्यावर भयंकर चर्चा करायची, त्या गोष्टीशी निगडीत व्यक्तीला एकतर डोक्यावर तरी घ्यायचं किंवा पार खाली पाडायचं आणि नव्याचे नऊ दिवस संपले कि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! शोधा नवीन काहीतरी मुद्दा, करा चर्चा, लिहा अग्रलेख!! राजकारणी आणि समाजातले तथाकथित विचारवंत/पुढारी हे केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे वागतात.. 

राहता राहिला मोदींच्या व्हिसा चा मुद्दा! निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार आहे हा.. हि लोकं पत्र लिहिणार, आणि तो ओबामा काय वाचणार आहे होय? बातमी ऐकून हसला असेल तो.. मला सांगा, अमेरिकेने मोदिंना व्हिसा नाकारला म्हणजे नक्की काय सिद्ध होतं? अमेरिकेला काही घेणं देणं नाहीये कोणी काय केलय त्याच्याशी.. तुम्ही दंगल करा नाहीतर भ्रष्टाचार करा.. त्यांना ज्याला व्हिसा द्यायचा आहे त्याला ते देणार.. आणि ज्याला नाहीये द्यायचा त्याला ते नाही देणार.. आणि ह्या लोकांना पत्र लिहिण्याची एवढीच हौस आहे तर म्हणव मनमोहनसिहांना लिहा कि पत्र.. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक पावलं उचला म्हणून..!!

असो.. लिहिण्यासारखं बरच काही आहे.. पण शेवटी हे अरण्यरुदनच!

Thursday, July 11, 2013

18. Sumedh gets the date! :-p



WhatsApp chat:
Note: This is written as per the conversation that happened..
As WhatsApp and other chatting applications are used for general conversation and people try to convey the meaning; punctuations, proper sentence construction, grammar is neglected, for typing fast.  


Friend: Hey sumedh
Whats up

Sumedh: Hoping to get the date real soon..

Friend: Owhh
Nice
With whom?

Sumedh: Will get it before 4th june
Or after 7th july
I would prefer before 4th june

Friend: :-p
Good luck
Who
Your course mate

Sumedh: Guess
:-p

Friend: Do i know her

Sumedh: Frankly i also dont know who will be there
Blind date actually

Friend: :-O

Sumedh: :-p

Friend: Are you crazy
Are you sumedh?
Not possible!

Sumedh: Am not crazy
I am sumedh
Of course

Friend: Okay
Fourth is not far then
Get ready :-p

Sumedh: Yes..
Any tips?

Friend: Hehe

Sumedh: I need to present myself properly

Friend: I have never had one yaar
Ask somebody else
Are you serious?
Where and how how did you decide?
Online
Ya.. you have started seeing girls

Sumedh: Not online
Full procedure is there
That i need to follow

Friend: as in


At this point I explained that I was talking about my confirmation date..

So finally today I gave my PhD confirmation presentation (qualifying exam). For this presentation school assigns a panel of professors as examiners. Then the date for presentation is fixed by adjusting the schedule according to the convenience of the related people. 

Note: I have taken the permission of my friend to use this part of our conversation. So people need not worry! :-p



Sunday, July 7, 2013

17. पाउस




आत्ता लोणावळ्याजवळ आलीये कॅब. काय मस्त वातावरण आहे! कालिदासाने मेघदूतात वर्णन केल्यासारखे डोंगरांना आलिंगन द्यायला ढग उतरले आहेत. ट्रेक्स! दर वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक्स! राजमाची आणि नागफणी हि तर पेटंट ठिकाणं. आत्ता मागच्या आठवड्यात मी आणि दाते नागफणीला आलो होतो तेव्हा असच वातावरण होतं. वरून काहीच दिसत नव्हतं. फक्त ढग होते आणि तोंडावर थपडा मारणारा पाउस! 

दर वर्षी मित्रांच्या वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर जातो इकडे तिकडे. आजच सकाळी रेडीओवर ‘युववाणी’मधे पावसावरच्या कार्यक्रमात माझं रेकॉर्डिंग लागलं होतं. चार पाच वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमातला काही भाग परत लावला होता. मी तेव्हा बोट क्लबच्या ग्रुप बरोबर केलेल्या राजमाचीच्या ट्रेकबद्दल बोललो होतो. तेव्हा पण जोरदार पाउस होता. अर्थात ट्रेकला जायचं म्हणजे पाउस पडायलाच हवा! राजमाचीला जायचं म्हणजे धबधबे दिसायलाच हवेत आणि चालून चालून पुढे आल्यावर ज्या धबधब्यात जाणाऱ्या पाण्यातून आपण चालत आलो तो धबधबा पाहिला कि एवढं चालल्याचं सार्थक होतं! धबधबे बघायचे म्हणजे अजून आतले.. मावळातले.. चहाचे आणि दुधाचे धबधबे असतात सगळीकडे! आम्ही घरचे सगळे जण गेलो होतो.. एक पाण्याच्या टाकीची साईट होती. तेव्हा तिकडे फिरताना इतका प्रचंड पाउस अनुभवला होता आणि इतके प्रचंड मोठे धबधबे पहिले होते! त्या प्रचंड पावसात आणि आणि त्या कच्च्या रस्त्यांवरून वाहणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यातून गाडी काढताना त्या ड्रायव्हरच सगळं कसब पणाला लागलं होतं..

आता इथे पाउस सुरु झालाय.. गाडीतल्या रेडीओवर गाणं पण लागलय – ‘पाणी दा रंग वेख के..’ सगळेच डोंगर ढगांनी झाकले गेलेत. हे सगळं वातावरण बघून असं वाटतंय कि आत्ता लगेचच केयूर, दाते, लिमये, सुकृत, सगळ्यांना फोन लावावा आणि उद्याचा ट्रेक ठरवावा..
    

Tuesday, July 2, 2013

16. फोडणी! (phodani)




माननीय आदरणीय श्री उमेशभाई गुलटेकडी यांना पुण्यनगरीमध्ये होणाऱ्या क्रीडास्पर्धांपासून दूर ठेवणार अशी बातमी ‘दुपार’नामक जाहिरातपत्रात (चुकलो वर्तमानपत्रात) वाचली आणि आम्ही हळहळलो! क्रीडास्पर्धा आणि उमेशभाई हे समीकरण पुण्यनगरीमध्ये इतके रुळले आहे कि कोणत्याही क्रीडास्पर्धेची सुरुवात भाईंनी फीत कापल्याशिवाय होत नसे. आता उपमाच द्यायची झाली तर मुंबापुरीमध्ये बॉम्बस्फोट झाला म्हणजे त्यात पाकिस्तानचा हात असणे अनिवार्य, किंवा ‘दुपार’प्रणीत कनिष्का उपक्रमात मा. सौ. प्रियाताई मुसळे, किंवा आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये डॉ. श्री. गोलाजी खांबे ह्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स अनिवार्य तसेच गेल्या काही वर्षांपर्यंत क्रीडास्पर्धा आणि उमेशभाई असे होते. (‘नसे’, ‘होते’ असे म्हणण्याचे कारण असे कि प्रतिगामी विचारांच्या काही नतद्रष्ट मंडळींच्या उचापतींमुळे आजकाल पुण्यनगरीमधील अत्यंत तडफदार आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेले आमचे उमेशभाई सध्या राजकीय वनवासात आहेत..)


तर हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वाचले आणि मग ‘महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे’ हे जे कुणीसे म्हणलेले आहे ते अगदी तंतोतंत खरे असल्याची प्रचिती आली. (इथे आम्ही हातातले वर्तमानपत्र बाजूला टाकले आणि कपातील चहाचा शेवटचा घोट घेतला.) वास्तविक पाहता पुण्यनगरीमध्ये क्रीडासंस्कृती रुजवली ती उमेशभाईंनी (काही कुत्सित विचारांचे, प्रतिगामी, नतद्रष्ट आणि निरुद्योगी लोक ‘.. आणि नंतर कुजवलीसुद्धा’ असे म्हणतील. पण कुजवण्यासाठी आधी ती रुजवावी लागते हे सत्य त्या लोकांना दिसत नाही..) प्रातःकाळी उठून, पर्वती, वेताळ अश्या टेकड्यांवर जाऊन जागतिक प्रश्नांची उकल करण्यात गुंग होणाऱ्या पुण्यनगरीमधील महाविद्वान मंडळींना (आणि मंडळींच्या मंडळींना) टेकड्यांचे मर्यादित अंतर संथगतीने चालण्याची सवय! पण आमच्या उमेशभाईंनी जागतिकीकरणाचे वारे केव्हाच ओळखले आणि पुण्यानगरीमध्ये marethon ची मुहूर्तमेढ रोवली. त्या इवल्याश्या रोपट्याचा मोठा वृक्ष झाला, बालेवाडीमध्ये (वापरात नसलेले – इति कु वि प्र न नि लोक) क्रीडासंकुल उभे राहिले! अश्या ह्या क्रीडामहर्षीकडून प्रेरणा घेऊन पुण्यनगरीमधील गल्लीबोळात नवनवीन क्रीडासंकुले उभी राहिली हे कु वि प्र न नि लोक देखील नाकारू शकणार नाहीत! तर अश्या ह्या क्रीडामहर्षींना क्रीडा स्पर्धांपासून दूर ठेवण्याची भाषा! हा हन्त हन्त! काय हि लोकं! म्हणतात ना घर फिरलं कि घराचे वासे पण फिरतात तशातली हि गत!


तर झाले असे कि काही विघ्नसंतोषी मंडळींच्या उचापतींमुळे उमेशभाईंची प्रतिमा डागाळली. खरं तर हस्तिनापुरमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा (म्हणजे उमेशभाईंचा, विघ्नसंतोषी मंडळींचा नव्हे) सिंहाचा वाटा होता, आणि हस्तिनापूरच्या सर्वेसर्वा सत्वशीलाबाई दीक्षितआज्जी ह्यांचा वाघिणीचा! (वाटा म्हणजे काम करण्याचा वाटा, नाहीतर कु वि प्र न नि लोक लगेच वेगळा अर्थ काढतात.) तर दोघांनी मिळून गांधीजींच्या थोर शिकवणुकीप्रमाणे क्रीडानगरीची उभारणी केली. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा नारा! पण आता परमदयाळू मायबाप सरकारने सुरु केलेल्या विविध रोजगार हमी (?) योजनांमुळे खेड्यांचे रूप पालटले! (ज्या योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आकडे ऐकून  सामान्य माणसे रोज गार पडतात त्या रोजगार योजना – इति कु वि प्र न नि लोक.) आता ‘खेड्यांकडे चला’ ह्या आदेशाचे पालन करण्यासाठी ‘नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडानगरीमध्येच खेड्याचा फील देता आला तर..’ अशी अभिनव कल्पना पुरोगामी आघाडीच्या ह्या दोन तरुण (म्हातारी न इतुकी, अवघे पाउणशे वयमान – पक्षी : सत्त्वशीलाआज्जी) आणि तडफदार नेत्यांच्या मनात आली आणि त्यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली.


कु वि प्र न नि विघ्नसंतोषी मंडळींना मात्र हे पाहवले नाही आणि त्यांनी उगाचच ‘भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला’ अश्या आरोळ्या मारायला सुरुवात केली. वास्तविक पाहता साप इत्यादी वन्य प्राण्यांना हस्तिनापूरच्या हवामानातदेखील क्रीडानगरीतील खोल्यांमध्ये आश्रय घ्यावासा वाटला हि एकच बाब त्या बांधकामाचा दर्जा किती उच्च होता आणि वेगळ्या वातानुकुलन यंत्रणेची तिथे आवश्यकता नव्हती हि गोष्ट सिद्ध करण्यास पुरेशी आहे, शिवाय हे प्राणी तिथे आले म्हणजे बाहेरून आलेल्या स्पर्धकांना उगाचच सरावासाठीच्या वेळापत्रकातून वेगळा वेळ काढून प्राणीसंग्रहालय वगैरे बघायला जात बसायला नको! (आयोजकांच्या अश्या विविध कौशल्यान्बद्दल आणि दूरदृष्टीबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण ते नंतर कधीतरी.)


असो. तर कु वि प्र न नि लोकांकडून चारित्र्यहननाचा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याने भाईंचे मन:स्वास्थ बिघडले. काही काळ विविध जबाबदारयांमधून (स्वखुशीने) मुक्त होऊन त्यांनी मन(मोहन)शांतीसाठी एकांतात नामस्मरण करण्याचे ठरवले. (रोज ते ‘आज सोनियाचा दिनू’ हे गाणे भक्तिभावाने ऐकतात!) त्यासाठी त्यांनी जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला अश्या जागेची म्हणजे कारागृहाची निवड केली. केवढे हे वैराग्य!


असे हे अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उमेशभाई. लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका पाहता पुण्यनगरीचे तारणहार आ. मा. श्री. उमेशभाई गुलटेकडी पुन्हा केव्हा सक्रीय होतात ह्याची आम्ही तूर्तास वाट बघत आहोत..  





ता. क.: लेख केव्हाच लिहून तयार होता, पण बी.एस.एन.एल. च्या कृपेने इंटरनेट (त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच) झोपलेले असल्याने प्रकाशित करता आला नाही.


काल माउली आणि तुकोबारायांच्या पालाखींचे आगमन पुण्यनगरीमध्ये झाले आणि त्याचदिवशी उमेशभाईंचा एका आंतरराष्ट्रीय समितीच्या निवडणुकीत पराभव झाला.. काय हा योगायोग! उमेशभाईंची सद्दी संपत चालल्याची हि नांदी तर नव्हे? काय होणार पुण्यनगरीचे ह्या निवडणुकीत? बातमी वाचता वाचता आम्ही स्वेटरच्या बाहीने अश्रू पुसले! आम्हाला सध्या ताप आलेला असल्याने आम्ही स्वेटर घालून पडून आहोत. इथे ‘कोणाचा ताप?’ असा प्रश्न काहीजण विचारतील. ताप म्हणजे ज्वर, किंवा शुद्ध भाषेत सांगायचे तर टेम्परेचर!