आत्ता लोणावळ्याजवळ आलीये कॅब. काय मस्त वातावरण
आहे! कालिदासाने मेघदूतात वर्णन केल्यासारखे डोंगरांना आलिंगन द्यायला ढग उतरले
आहेत. ट्रेक्स! दर वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक्स! राजमाची आणि नागफणी हि तर पेटंट
ठिकाणं. आत्ता मागच्या आठवड्यात मी आणि दाते नागफणीला आलो होतो तेव्हा असच वातावरण होतं. वरून
काहीच दिसत नव्हतं. फक्त ढग होते आणि तोंडावर थपडा मारणारा पाउस!
दर वर्षी मित्रांच्या वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर जातो
इकडे तिकडे. आजच सकाळी रेडीओवर ‘युववाणी’मधे पावसावरच्या कार्यक्रमात माझं
रेकॉर्डिंग लागलं होतं. चार पाच वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमातला काही भाग परत लावला
होता. मी तेव्हा बोट क्लबच्या ग्रुप बरोबर केलेल्या राजमाचीच्या ट्रेकबद्दल बोललो
होतो. तेव्हा पण जोरदार पाउस होता. अर्थात ट्रेकला जायचं म्हणजे पाउस पडायलाच हवा!
राजमाचीला जायचं म्हणजे धबधबे दिसायलाच हवेत आणि चालून चालून पुढे आल्यावर ज्या धबधब्यात
जाणाऱ्या पाण्यातून आपण चालत आलो तो धबधबा पाहिला कि एवढं चालल्याचं सार्थक होतं! धबधबे
बघायचे म्हणजे अजून आतले.. मावळातले.. चहाचे आणि दुधाचे धबधबे असतात सगळीकडे! आम्ही घरचे सगळे
जण गेलो होतो.. एक पाण्याच्या टाकीची साईट होती. तेव्हा तिकडे फिरताना इतका प्रचंड
पाउस अनुभवला होता आणि इतके प्रचंड मोठे धबधबे पहिले होते! त्या प्रचंड पावसात आणि
आणि त्या कच्च्या रस्त्यांवरून वाहणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यातून गाडी काढताना
त्या ड्रायव्हरच सगळं कसब पणाला लागलं होतं..
आता इथे पाउस सुरु झालाय.. गाडीतल्या रेडीओवर
गाणं पण लागलय – ‘पाणी दा रंग वेख के..’ सगळेच डोंगर ढगांनी झाकले गेलेत. हे सगळं
वातावरण बघून असं वाटतंय कि आत्ता लगेचच केयूर, दाते, लिमये, सुकृत, सगळ्यांना फोन
लावावा आणि उद्याचा ट्रेक ठरवावा..
No comments:
Post a Comment