Wednesday, November 28, 2012

।।श्रीगणेशाय नमः।।

।।श्रीगणेशाय नमः।। 
तर हे माझं ब्लॉगसाठीच अधिकृत लिखाण आहे. ह्याआधी मी एकदा सावरकरांवर लेख लिहायला घेतला होता. पण तो अर्धवटच राहिला. त्याआधी मी आमच्या table tennis च्या एका match बद्दल लिहिलं होतं, पण ते 'प्रकाशित' वगैरे नाही केलं. इथे सिंगापूरला आल्यापासून मी 'सिंगापूर पत्रक' लिहायला सुरुवात केली होती. त्याच श्रेय सोनालीला जातं. ती बराच काळ माझ्या मागे लागली होती कि काहीतरी लिहित जा म्हणून. त्यातून 'सिंगापूर पत्रक' ची सुरुवात झाली. (इथे एक खुलासा केलेला बरा: सोनाली म्हणजे माझी वहिनी. नाहीतर उगाच संशयकल्लोळ व्हायचा. नामसाधर्म्याचा वापर खुबीने करण्यात आमचा मित्रवर्ग पटाईत आहे. :-p ). गेले काही दिवस चिन्या म्हणत होता कि ब्लॉग लिहायला सुरुवात कर. तर आज* श्रीगणेशा करतोय.किती नियमितपणे लिहीन आणि आत्ता जे लिहितोय ते तरी ब्लॉगवर टाकीन का ह्याबद्दल शंकाच आहे. पण असो.

शक्यतो मराठीमध्येच लिहीन मी. (कधी इच्छा झाली तर इंग्रजी मध्ये सुद्धा लिहीन.) अर्थात हे लिखाण संपूर्णपणे मराठीत नसेलच. सहज शक्य आहे तिथे मराठी प्रतिशब्द वापरण्याचा विचार आहे. पण दैनंदिन जीवनात (day to day life) मध्ये  इंगजी शब्द इतके रुळलेले असतात कि सवय मोडणं कठीण जातं. :-D तसेच लिखाणात प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषेचा वापर अधिक होण्याची शक्यता आहे.   ह्या आणि आगामी लेखांमध्ये (जर काही लिहिल तर) उगाचच त्यावेळी मनात आलेले विचार लिहीन. त्यामुळे लिखाण विनोदी किंवा वैचारिक अस वर्गीकरण करता येण्याजोग असेल अशी अपेक्षा बाळगू नये.पण थोडी विनोदाची फोडणी देण्याचा प्रयत्न असेल. (सध्या स्वयंपाक हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने अश्या गोष्टी सुचताहेत :-p ). हे काही सलग बसूनच लिहीन असहि  नाही. त्यामुळे लिखाणात सलगता असेलच किंवा एखाद्या परिच्छेदाचा पुढच्या परिच्छेदाशी संबंध असेलच असहि  नाही. चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलाच असेल कि मी कंसामध्ये प्रतिशब्द पण लिहित आहे. थोडा माज करावा म्हणल.. :-) असही अनेक कोकणस्थ मित्रांमुळे आत्मप्रौढीची आणि फुकटचा माज करायची सवय लागतेच माणसाला (ह्याबाबतीत प्रणव आणि सनी हे दोन सन्माननीय अपवाद!).  मग जे जमत त्याचा माज का करू नये असा एक विचार मनात आला. :-D 

तर मूळ मुद्दा हा कि मी लिखाण करायला सुरुवात करतोय. तसा लिखाणाच्या बाबतीत मी लहानपणापासूनच आळशी आहे. (खर तर सगळ्याच बाबतीत :-D ). चौथीच्या शिष्यवृत्तीच्या (scholarship) च्या परीक्षेत दहा ओळींचा निबंध आणि चित्रवर्णनाचा प्रश्न असायचा (गेले ते दिन..). ते सुद्धा कमी लिहायचो. शाळेच्या परीक्षेतल्या निबंधाची तर गोष्टच सोडा. एकदाच फक्त मी अगदी छान निबंध लिहिला होता. विषय होता 'माझा आवडता लेखक'. मी भा. रा. भागावातान्बद्दल लिहिलं  होतं. माझ्या समवयस्क असलेल्या किती जणांना ह्या गोष्टी माहिती असतील माहित नाही. पण मला त्यांच्या फास्टर फेणे, नंदू नवाथे, बिपीन बुकलवारच्या गोष्टी फार आवडायच्या. फास्टर फेणे तर अजूनही आवडतो. कसला चपळ, तुडतुड्या, चुणचुणीत मुलगा आहे तो! तर सांगायचा मुद्दा हा कि लिखाण होत नाही फारस. त्यामुळे कधी काही सुचल तरी केवळ बोलून दाखवल जात. लिहून ठेवणं वगैरे प्रकार नाही. अनेकदा सुचत पण चंद्रकिरणांप्रमाणे निसटून जातं, हाती गवसत नाही [१]. खर तर मला लेखानिकाची गरज आहे. पूर्वी टिळक वगैरे जस करायचे तस. ते अग्रलेख वगैरे सांगताहेत आणि हा लिहितोय. अर्थात मी काही टिळकांशी तुलना करत नाहीये. कुठे तो नरकेसरी आणि कुठे आम्ही..(नरउंदिर..?) [२]. (अजून एक गोष्ट म्हणजे लिखाणाशी निगडीत संदर्भ हे IEEE च्या मार्गदर्शक तत्वान्प्रमाणे देत आहे.) व्यासोsत्छिष्टम जगत्सर्वं" तस पुलंनि इतक्या उपमा वापरल्या आहेत, इतक्या कोट्या केल्या आहेत, कि नवीन उपमा, विनोद करण जरा अवघड जातं . किंबहुना तेच विनोद करण्याचा मोह अनावर होतो. नाईलाज आहे. अर्थातच योग्य ठिकाणी संदर्भ दिले जातीलच. कोणी वांग्मयचौर्याचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. :-p

सध्या 'सिंगापूर पत्रक' बंद आहे. लेखक जरा जास्तच देशस्थि काराभाराने वागणारा असल्याने अस होणारच. तस लिखाण करण्याची इच्छा होते, पण आळशीपणा नडतो. अजून एक इच्छा म्हणजे एखाद गाणं लिहून ते बसवाव अस आहे मनात. आपल्याकडे गायक आणि वादक मंडळींची (आणि मंडळींच्या मंडळींची) काही कमतरता नाहीये. आता काहीतरी सुचायला हव मात्र. त्याचीच वाट बघतोय. तस मध्ये चिन्मय म्हणाला म्हणून आम्ही दोघांनी 'गारवा' च विडंबन केला होतं [३]. पण काहीतरी नवीन सुचायला हव आता. असो. नवीन काही सुचल नाही आणि गाणं करण वगैरे झाल नाही तरी अधुन मधून लिखाण करीन काहीतरी. समर्थ रामदासांनी सांगितलच आहे कि 'दिसामाजी काहीतरी लिहावे'. तेव्हा कधीतरी अधून मधून लिहाव म्हणतो.

blogging ची सुरुवात रोजच्या सपक जेवणाने (उदा: दुपारचा वरण भात ) झालीये. हा पहिला लेख विशेष काही न लिहिताच संपवला असल्याची जाणीव आमच्या (चतुर चाणाक्ष  इ. इ.) वाचकांना झालीच असेल. पुढील लेखात काहीतरी मसालेदार आणि चटकदार (उदा: पुलाव) वगैरे सदर करायचा प्रयत्न करीन. (पोरगा नावाखा आणि शिकाऊ आहे अजून. वेगवेगळे पदार्थ जमायला जरा वेळ लागणारच). नाहीच जमला काही तर बिरबलाची खिचडी झिंदाबाद!

जाता जाता एक विचार: ह्या अश्या सगळ्या गोष्टी परीक्षा जवळ आलिकीच सुचतात. परवा paper आहे. काडीचाही अभ्यास झाला नाहीये. आणि हे अस चालू आहे. आज संध्याकाळी मी आणि चिन्या डिसेंबर च्या सुट्टीत पुण्यात गेल्यावर ट्रीपला कुठे जायचा ह्याचे बेत आखत बसलो होतो. हे म्हणजे 'बाजारात तुरी..' असच झाल. पुण्यात जाणार इन मिन १० दिवस. त्यात सगळ्यांची गाठभेट होऊन सगळ्यांच्या वेळा जुळतील का ते माहित नाही, पण आमचे बेत मात्र चालू आहेत इथे.. :-D असो.

विशेष सूचना: कधीकधी शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण राहून जातं. त्याबद्दल क्षमस्व. चूकभूल देणे घेणे.

संदर्भसूची:
[१] पु ल देशपांडे, खिल्ली.
[२] पु ल देशपांडे, खिल्ली
[३] http://chinmay-datar.blogspot.sg/2012/08/lab-cha-garwa.html

* काल रात्री हे लिहिलं. आज कार्तिकी पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर  ब्लॉग वर टाकतोय. आज पर्वतीवर जत्रा लागली असेल. आज जोडप्याने विशेषतः नवविवाहित जोडप्याने कार्तिकेयाच दर्शन घेण्याची प्रथा आहे. एरवी त्या देवळात कोणी फिरकत नाही. पण आज मात्र पार मागे रमणा गणपतीपर्यंत रांगा लागलेल्या असतात! आज चंद्रग्रहण पण आहे. अवश्य पाहावे.