आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणून काय
पुसता? आम्ही असू लाडके-
म्याडमचे, दिधला असे देश
तये आम्हास खावावया;
देशी ह्या पैशांबले विचरतो
घेऊन तांडा सवे,
दुष्काळीही विधिमंडळात
अमुचे चहापान चालू असे..
सारेही पोलीसदळ कसे
आम्हापुढे ते झुके
“पाणि”स्पर्शच आमुचा पुरतसे
गुंडांना पोसावया!
वाचिवीर अम्ही, सदा करू अशी
श्रेष्ठींची चाटुगिरी
बोंबा मारा तुम्ही, अम्ही धरू
सदा निष्ठेने जोडे उरी!
मुंबैमाजि वसाहती वसविल्या
बांग्लादेशींच्या कुणी?
महागाईच्या अगीत तेल ओतले,
बारा रुपड्यांचे कुणी?
ते आम्हीच निलाजरे, घडवितो
आदर्शचे घोटाळे!
ते आम्हीच ‘निधर्मी’, दंगल
सदा ज्यांच्यामुळे होतसे!!
आम्हाला वगळा - गतप्रभ झणी
होतील कारागृहे!
आम्हाला वगळा - सुखीच मग हो
आम-आदमी चे जिणे!!
No comments:
Post a Comment