माननीय आदरणीय श्री उमेशभाई गुलटेकडी यांना
पुण्यनगरीमध्ये होणाऱ्या क्रीडास्पर्धांपासून दूर ठेवणार अशी बातमी ‘दुपार’नामक
जाहिरातपत्रात (चुकलो वर्तमानपत्रात) वाचली आणि आम्ही हळहळलो! क्रीडास्पर्धा आणि
उमेशभाई हे समीकरण पुण्यनगरीमध्ये इतके रुळले आहे कि कोणत्याही क्रीडास्पर्धेची
सुरुवात भाईंनी फीत कापल्याशिवाय होत नसे. आता उपमाच द्यायची झाली तर मुंबापुरीमध्ये
बॉम्बस्फोट झाला म्हणजे त्यात पाकिस्तानचा हात असणे अनिवार्य, किंवा ‘दुपार’प्रणीत
कनिष्का उपक्रमात मा. सौ. प्रियाताई मुसळे, किंवा आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये
डॉ. श्री. गोलाजी खांबे ह्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स अनिवार्य तसेच गेल्या काही
वर्षांपर्यंत क्रीडास्पर्धा आणि उमेशभाई असे होते. (‘नसे’, ‘होते’ असे म्हणण्याचे
कारण असे कि प्रतिगामी विचारांच्या काही नतद्रष्ट मंडळींच्या उचापतींमुळे आजकाल
पुण्यनगरीमधील अत्यंत तडफदार आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेले आमचे उमेशभाई सध्या
राजकीय वनवासात आहेत..)
तर हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वाचले आणि
मग ‘महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे’ हे जे कुणीसे म्हणलेले आहे ते अगदी तंतोतंत
खरे असल्याची प्रचिती आली. (इथे आम्ही हातातले वर्तमानपत्र बाजूला टाकले आणि
कपातील चहाचा शेवटचा घोट घेतला.) वास्तविक पाहता पुण्यनगरीमध्ये क्रीडासंस्कृती
रुजवली ती उमेशभाईंनी (काही कुत्सित विचारांचे, प्रतिगामी, नतद्रष्ट आणि
निरुद्योगी लोक ‘.. आणि नंतर कुजवलीसुद्धा’ असे म्हणतील. पण कुजवण्यासाठी आधी ती
रुजवावी लागते हे सत्य त्या लोकांना दिसत नाही..) प्रातःकाळी उठून, पर्वती, वेताळ
अश्या टेकड्यांवर जाऊन जागतिक प्रश्नांची उकल करण्यात गुंग होणाऱ्या पुण्यनगरीमधील
महाविद्वान मंडळींना (आणि मंडळींच्या मंडळींना) टेकड्यांचे मर्यादित अंतर संथगतीने
चालण्याची सवय! पण आमच्या उमेशभाईंनी जागतिकीकरणाचे वारे केव्हाच ओळखले आणि
पुण्यानगरीमध्ये marethon ची मुहूर्तमेढ रोवली. त्या इवल्याश्या रोपट्याचा मोठा
वृक्ष झाला, बालेवाडीमध्ये (वापरात नसलेले – इति कु वि प्र न नि लोक) क्रीडासंकुल
उभे राहिले! अश्या ह्या क्रीडामहर्षीकडून प्रेरणा घेऊन पुण्यनगरीमधील गल्लीबोळात
नवनवीन क्रीडासंकुले उभी राहिली हे कु वि प्र न नि लोक देखील नाकारू शकणार नाहीत!
तर अश्या ह्या क्रीडामहर्षींना क्रीडा स्पर्धांपासून दूर ठेवण्याची भाषा! हा हन्त हन्त!
काय हि लोकं! म्हणतात ना घर फिरलं कि घराचे वासे पण फिरतात तशातली हि गत!
तर झाले असे कि काही विघ्नसंतोषी मंडळींच्या
उचापतींमुळे उमेशभाईंची प्रतिमा डागाळली. खरं तर हस्तिनापुरमध्ये राष्ट्रकुल
क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा (म्हणजे उमेशभाईंचा, विघ्नसंतोषी मंडळींचा
नव्हे) सिंहाचा वाटा होता, आणि हस्तिनापूरच्या सर्वेसर्वा सत्वशीलाबाई
दीक्षितआज्जी ह्यांचा वाघिणीचा! (वाटा म्हणजे काम करण्याचा वाटा, नाहीतर कु वि प्र
न नि लोक लगेच वेगळा अर्थ काढतात.) तर दोघांनी मिळून गांधीजींच्या थोर
शिकवणुकीप्रमाणे क्रीडानगरीची उभारणी केली. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा नारा!
पण आता परमदयाळू मायबाप सरकारने सुरु केलेल्या विविध रोजगार हमी (?) योजनांमुळे
खेड्यांचे रूप पालटले! (ज्या योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आकडे ऐकून सामान्य माणसे रोज गार पडतात त्या रोजगार योजना
– इति कु वि प्र न नि लोक.) आता ‘खेड्यांकडे चला’ ह्या आदेशाचे पालन करण्यासाठी
‘नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडानगरीमध्येच खेड्याचा फील देता आला तर..’ अशी
अभिनव कल्पना पुरोगामी आघाडीच्या ह्या दोन तरुण (म्हातारी न इतुकी, अवघे पाउणशे
वयमान – पक्षी : सत्त्वशीलाआज्जी) आणि तडफदार नेत्यांच्या मनात आली आणि त्यांनी
त्याप्रमाणे कार्यवाही केली.
कु वि प्र न नि विघ्नसंतोषी मंडळींना मात्र हे
पाहवले नाही आणि त्यांनी उगाचच ‘भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला’ अश्या आरोळ्या
मारायला सुरुवात केली. वास्तविक पाहता साप इत्यादी वन्य प्राण्यांना
हस्तिनापूरच्या हवामानातदेखील क्रीडानगरीतील खोल्यांमध्ये आश्रय घ्यावासा वाटला हि
एकच बाब त्या बांधकामाचा दर्जा किती उच्च होता आणि वेगळ्या वातानुकुलन यंत्रणेची
तिथे आवश्यकता नव्हती हि गोष्ट सिद्ध करण्यास पुरेशी आहे, शिवाय हे प्राणी तिथे
आले म्हणजे बाहेरून आलेल्या स्पर्धकांना उगाचच सरावासाठीच्या वेळापत्रकातून वेगळा
वेळ काढून प्राणीसंग्रहालय वगैरे बघायला जात बसायला नको! (आयोजकांच्या अश्या विविध
कौशल्यान्बद्दल आणि दूरदृष्टीबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण ते नंतर
कधीतरी.)
असो. तर कु वि प्र न नि लोकांकडून चारित्र्यहननाचा
घृणास्पद प्रकार करण्यात आल्याने भाईंचे मन:स्वास्थ बिघडले. काही काळ विविध
जबाबदारयांमधून (स्वखुशीने) मुक्त होऊन त्यांनी मन(मोहन)शांतीसाठी एकांतात
नामस्मरण करण्याचे ठरवले. (रोज ते ‘आज सोनियाचा दिनू’ हे गाणे भक्तिभावाने ऐकतात!)
त्यासाठी त्यांनी जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला अश्या जागेची म्हणजे कारागृहाची निवड केली.
केवढे हे वैराग्य!
असे हे अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उमेशभाई.
लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका पाहता पुण्यनगरीचे तारणहार आ. मा. श्री.
उमेशभाई गुलटेकडी पुन्हा केव्हा सक्रीय होतात ह्याची आम्ही तूर्तास वाट बघत आहोत..
ता. क.: लेख केव्हाच लिहून तयार होता, पण
बी.एस.एन.एल. च्या कृपेने इंटरनेट (त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच) झोपलेले
असल्याने प्रकाशित करता आला नाही.
काल माउली आणि तुकोबारायांच्या पालाखींचे आगमन
पुण्यनगरीमध्ये झाले आणि त्याचदिवशी उमेशभाईंचा एका आंतरराष्ट्रीय समितीच्या निवडणुकीत
पराभव झाला.. काय हा योगायोग! उमेशभाईंची सद्दी संपत चालल्याची हि नांदी तर नव्हे?
काय होणार पुण्यनगरीचे ह्या निवडणुकीत? बातमी वाचता वाचता आम्ही स्वेटरच्या बाहीने
अश्रू पुसले! आम्हाला सध्या ताप आलेला असल्याने आम्ही स्वेटर घालून पडून आहोत. इथे
‘कोणाचा ताप?’ असा प्रश्न काहीजण विचारतील. ताप म्हणजे ज्वर, किंवा शुद्ध भाषेत
सांगायचे तर टेम्परेचर!