Thursday, January 31, 2013

8. उखाणे (ukhane)


सध्या सगळीकडून लग्नांचेच विषय कानावर येत आहेत. आत्ता डिसेंबर आणि जानेवारी मधे ५ लग्नांची आमंत्रणं होती. पण मला त्यातल्या एकाच लग्नाला जाता आलं. बाकीची सगळी मी पुण्यात गेलो त्याच्या आधीच्या आठवड्यात किंवा मी पुण्यातून निघाल्यानन्तरच्या आठवड्यात होती. पण काही म्हणा, सध्या ह्या सारख्याच ह्या अश्या 'news' मिळत आहेत. प्रणव पण असल्याच काहीतरी बातम्या देतो आणि म्हणतो "अरे ढबू, काय सांगायच अरे, कोणीही भेटला कि अशीच काहीतरी बातमी कळते अरे.. लग्न नाहीतर साखरपुडा.. नाहीतर प्रकरण.. अगदीच काही नाही तर निदान लोकांची खटपट तरी चालू असतेच.." facebook वर सुद्धा लग्न नाहीतर साखरपुड्यांचेच फोटो असतात. असो. आता सध्या लग्नसराई चे दिवस संपले असले तरी लौकरच पुन्हा लग्नांच्या बातम्या सुरु होतीलच. सध्या senior लोकांच्या लग्नांच्या बातम्या आहेत. ह्या वर्षभरात आमच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींची लग्नं सुद्धा होतीलच (कदाचित एकमेकांशी सुद्धा.. :-p ). आता लग्न म्हणलं म्हणजे 'नाव घेणं' आलं. तर स्वतःचा हजरजबाबीपणा दाखवण्याच्या आणि सासरच्या मंडळींवर आपली छाप पाडण्याच्या ह्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात आमची मित्रमंडळी (आणि त्यांची मंडळी!) कमी पडू नयेत ह्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आम्ही इथे काही उखाणे सादर करीत आहोत. काही उखाण्यांना COEP ENTC च्या वर्गातले संदर्भ  आहेत. ते आणि इतर काही उखाणे अनाकलनीय वाटण्याची शक्यता आहे. पण उखाण्यामध्ये कशाचा कशाला काही संदर्भ असलाच पाहिजे असा काही नियम आमच्या तरी ऐकिवात नाही. नमुन्यादाखल १६ उखाणे दिले आहेत. काही उखाण्यांना आधुनिकतेची झालर देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रकारचे उखाणे आम्ही तयार करून देऊ शकतो. आम्ही 'personalized' उखाणे सुद्धा तयार करतो (उदा: उखाणा क्रमांक २, ५, १२). आपल्या व्यवसायाप्रमाणे किंवा शिक्षणाप्रमाणे देखील आम्ही उखाणे तयार करून देऊ (उदा: उखाणा क्रमांक १६). ENTC च्या लोकांसाठी ciruits वगैरे वर आधारित उखाणे देखील तयार करून मिळतील. वाचकांपैकी कोणासही कसलीही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. 


१. CD त CD Moserbaer ची CD
- - राव ओढतात संभाजी बिडी 


२. रोज संध्याकाळी - - ला देते missed call
आमची भेटण्याची जागा म्हणजे civil drawing hall


३. लग्नासाठी अट होती हवी Audi गाडी
- - रावांच नाव घेते नेसून नऊवारी साडी

४. दिवसभर करत बसतात MATLAB चे code
- - रावांच्या चेहेऱ्यावर उष्णतेचे फोड

५. माहेरच आडनाव - -, सासरच पार्ले
- - रावांना नाही आवडत तोंडलं आणि कारले

६. आकाशातून उल्का पडून झाले लोणार सरोवर
स्वप्नात दिसले - - राव पोहोताना मगरीबरोबर

७. माझ्या आजीने नाही चुकवली कधी पंढरीची वारी
- - राव खातात चहाबरोबर खारी

८. पुण्यामध्ये famous सुजाताची मस्तानी
- - माझा बाजीराव मी त्याची मस्तानी

९. team India चा captain महेंद्रसिंह धोनी
- - रावांची style म्हणजे मिशी आणि pony

१०. मंगळावरती यान पाठवते अमेरिकेची नासा
- - राव म्हणजे अगदी भित्रा ससा

११. - - राव रोज रात्री ढोसतात coke आणि beer
साधा mixer नाही होत दुरुस्त आणि म्हणे मी engineer

१२. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना
- - ला आवडते सोनाक्षी सिन्हा

१३. सशक्त भारत सशक्त महिला
- - च नाव घेते भरवताना घास पहिला

१४. दात स्वच्छ ठेवण्यासाठी भरते खळखळून चुळा
पहिल्याच भेटीत मला पाहून - - झाला खुळा

१५. processor i5, nvidia च card, 8 gb ची ram आणि 1tb ची sata
- - रावांच्या घशात अडकला पापलेटचा काटा

१६. software engineer चा उखाणा:
microsoft ने घेतली skype, महिंद्रा ने सत्यम
- - ने जिंकलं मन, करून भरतनाट्यम



बोनस : गणेश नावाच्या मुलाला एखादी मुलगी कशी propose करेल?
ऐलोमा पैलोमा गणेश देवा
माझ्याशी संसार कर करीन तुझी सेवा



Saturday, January 26, 2013

फुकटे grad students


Grad students सगळीकडे फुकट गोष्टी शोधत हिंडत असतात.. आणि सध्या तर दिवसच आहेत ते.. बायका जसं संक्रांतीच्या वगैरे हळदीकुंकवांना जाउन लुटून येतात तसं आम्ही सध्या career fairs मध्ये जाउन लुटून येतो.. भारतात जशी engineering नंतर placement होते तसा इथे नसतं. career fair मधे कंपन्यांचे बूथ असतात. तिथे जाउन resume द्यायचा. आणि मग कंपनी आणि तुम्ही बघून घ्या काय ते.. तर ह्या बूथ वर येणाऱ्या लोकांना कंपनी वाले काही ना काही देतातच diary वगैरे . अगदीच काही नाही तर पेन तरी देतात. त्यामुळे वर्षभराची सामुग्री जमवायला सगळी लोकं तिकडे हजेरी लावतात. परवा असाच एका बूथ वर laser pointer वालं पेन मिळालं. पुण्यात शंभर-दीडशे रुपये पडतात. परवा फुकट मिळालं :-D आता खरतर आमच काहीच काम नव्हतं तिथे, पण जर ती लोकं एवढी फुकट वाटायला बसलीच आहेत, तर मग का सोडा, म्हणून आम्ही गेलो होतो.

जगातली सगळ्यात मोठी फुकटखाऊ जमात कोणती असेल तर ती म्हणजे grad students ची. आमच्या इतके फुकटे लोक जगात नसतात. आता वाचणाऱ्या public पैकी काही जण नाही म्हणतील.. पण मनात मात्र ते हो च म्हणतील.  कुठेही फुकट खायला मिळणार असलं आम्ही सगळ्यात पुढे. university मधले fest आणि तत्सम प्रकारात जरा इकडे तिकडे नजर टाकली कि लग्गेच कळत. अर्थात काय करणार म्हणा मजबुरी आहे. आम्ही असलेल्या शहरातल्या किंवा आसपासच्या नातेवाइक किंवा ओळखीच्या मंडळींनी जेवायला बोलावण्याची आम्ही वाटच पाहत असतो! (मागच्याच आठवड्यात राजश्री कडे जाउन आलो).  त्यातून जर आपण राहत असलेल्या शहरात महाराष्ट्र मंडळ असेल तर गणेशोत्सव आणि दिवाळी म्हणजे पर्वणीच! एरवीसुद्धा वाढदिवस वगैरे म्हणजे मजा असते. 'दिल चाहता है' प्रमाणे 'केक खाने के लिये हम कहीं भी जा सकते है'. मुलींच्या वाढदिवसाला तर आवर्जून जायचं. केक कापून झाला कि त्या फोटो बीटो काढत बसतात. मग आपण केक, वेफर्स वगैरे वर ताव मारायचा. मुलांच्या वाढदिवसाला जाण्यात रिस्क असते. हाणामारी होते तिथे.

तर हे सगळ्यांच्या बाबतीत सारख असत. पण department प्रमाणे त्यात फरक पडतो. म्हणजे अस बघा कि biological sciences, humanities असल्या ठिकाणी happy hours वगैरे प्रकार असतो. तेव्हा खाणं पिणं फुकट असतं. (हो.. पिणं सुद्धा!! ) आता आमच्या इथे नवीन एक department झालय. त्यांना दर शुक्रवारी दुपारी जेवण आहे. अस असतं एकेका department च. पण सगळ्यात वाईट अवस्था म्हणजे EEE (electrical and  electronics ) आणि SCE (school of computer engineering) वाल्यांची असते. सगळा वेळ lab मध्येच असतात. आणि हे happy hour वगैरे काही प्रकार नसतात. एकतर lab मधल्या त्या cubicles मध्ये बसून माणसाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपून जातात. त्यामुळे त्याला संध्याकाळी घरी जाणं म्हणजेच एक आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे happy hour वगैरेची गरजच नाही काही! हुशार आहेत हि departments चालवणारे लोक. त्या खुराड्यात बसून माणूस संपून जातो. हो.. खुराडंच ते.. एक computer आणि एक खुर्ची ह्याला अशी किती जागा लागते.. SCE वाले लोक म्हणजे कोंबडयानसारखे असतात. मालक अधुन मधून कधीतरी खुराड्याकडे चक्कर टाकतो अंडं दिलय का (research paper साठी काही काम झालय का) ते बघायला.. आणि हो खरच लागू होते हि उपमा.. काही लोकं म्हणजे prof लोकांसाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात म्हणजे IEEE Transactions मध्ये paper वगैरे.. असो. जास्त ताणायला नको.. :-D

Friday, January 25, 2013

Soniya, अजब तुझे सरकार!




सोनिया, अजब तुझे सरकार!
भाट सभोती, पुत्र मंदमती, मूकबधीर 'प्रधान'!

कष्टकऱ्यांना दुर्मिळ दमडी, श्रीमंतांना मात्र सवलती,
wallmart ला पायघड्या अन कृषक विके घरदार!

जेवणात ना मिळे भाकरी, मद्यावरती मात्र subsidy,
रुपयाचा पण भाव उतरला, तरुण इथे बेकार!

मंत्री खाती कोटी रुपये, सामान्यांना पुरेत सहाशे?
वर्षाकाठी सहा cylinder सांग कसे पुरणार?

खादाड राजा spectrum वाटे, कलमाडीचे 'खेळ' चालले,
भ्रष्टाचारी अति माजले, जन होती लाचार!

हफीज, दाउद नामनिराळे, अफझलचे पण लाड चालले,
मुजाहिदीन ते स्फोट घडविती, RSS बदनाम!



मूळ गाणे: उद्धवा अजब तुझे सरकार
गीतकार:ग दि माडगुळकर
link : https://www.youtube.com/watch?v=fIDCS14uS94

Thursday, January 24, 2013


आजच सिनेमा पाहिला - जगाच्या पाठीवर. ह्या सिनेमा मधली गाणी खूप ऐकली होती रेडिओवर. आमच्याकडे गाण्यांची कॅसेट पण आहे. काय सुंदर सुंदर गाणी आहेत. त्यामुळे खर तर सिनेमा बघायचा होता. ऐकल पण बरच होत ह्या सिनेमाबद्दल. पटकथा, संवाद, गाणी सब कुछ गदिमा असा सिनेमा आहे. चांगला आहे. सिनेमा मध्ये काही अतार्किक गोष्टी सोडून दिल्या आणि 'असं का?' असा प्रश्न विचारला नाही तर चांगला आहे सिनेमा. सगळ्यांचे अभिनय पण उत्तम. विशेषतः सीमा देव. आणि अर्थातच राजा परांजपे सारख्या दिग्गज माणसाबद्दल काय बोलणार! माडगुळकरान्नी पण काम केला आहे सिनेमामध्ये. इतकी शेकडो (हजारोच खरतर) गाणी लिहिली त्यांनी. सर्व प्रकारची. भक्तिगीते, भावगीते, शृंगारिक गीते.. शुद्ध भाषेत लिहिलं, अशुद्ध भाषेत लिहिलं! त्यांच्याबद्दल माणसाने बोलावं तितकं थोडंच आहे. आत्ता दोनच गोष्टी सांगतो. असं म्हणतात कि
उपमा कालिदासस्य, भारवे: अर्थगौरवं,
दंडीन: पदलालित्यं, माघे सन्ति त्रयोगुण:

माडगुळकरांना काय म्हणणार मग? माझ्या मते भाषाप्रभू! दुसरं काय म्हणणार! सर्व अलंकार अगदी मनसोक्त वापरले आहेत त्यांनी त्यांच्या साहित्यात. रूपक, उपमा, अन्योक्ती.. आपल्याला तर नावं पण आठवणार नाहीत. ऐतिहासिक, पौराणिक गोष्टींचा किती सहज पणे संदर्भ येतो. उदा: राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा.. गीतरामायण वगैरे तर काय!! बोलणच खुंटलं! एकच शेवटच सांगतो आत्ता.. ह्या माणसाने बैल हा शब्द सुरुवातीला घेऊन गाणं लिहिलं  आहे..!!  'बैल तुझे हरणावाणी...' आत्ता इतकच पुरे.. त्यांच्या साहित्याबद्दल लिहीन पुन्हा केव्हातरी. 

मराठीमधल्या नटांपैकी सगळ्यात handsome नट म्हणजे मी तरी म्हणीन कि अरुण सरनाईक. तरुणपणीची  विक्रम गोखले किंवा राजा गोसावी किंवा रवींद्र महाजनी वगैरे लोकं ठीक आहेत. काहीजण म्हणतील रमेश देव म्हणून. पण handsome म्हणजे अरुण सरनाईक! 'प्रथम तुज पाहता' मधला किंवा 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' मधला अरुण सरनाईक पहा. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हयंचे सिनेमे मस्त विनोदी होते. दर शनिवारी आणि रविवारी दुपारी लागायचे. काय काय सिनेमे आहेत. निखळ विनोदी. म्हणजे घरातले सगळे एकत्र बसून एन्जोय करू शकतील असे. 'बनवाबनवी' काय किंवा 'आयत्या घरात घरोबा' काय किंवा 'माझा पती करोडपती' काय.. मस्त सिनेमे. बघा आणि पोट धरून हसा.. काय अफ़लातून कामं केली आहेत त्या लोकांनी. काय काय dialogue आहेत! विशेषतः 'बनवाबनवी' मधले! तसेच अजून काही सिनेमे म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेचे. तो 'व्याख्या विक्खी वूक्खू' वाला तर जबरदस्त आहे. म्हणजे तो हा.. काय बरं त्याच नाव हान..धुमधडाका! तो म्हणजे हिंदिमधल्या 'प्यार किये जा' चा रिमेक आहे. तसाच अजून एक मस्त सिनेमा म्हणजे 'चोरीचा मामला..' गाणं वाला.. ह्या लोकांचे इतरही बरेच आहेत सिनेमे. पण हे मस्त आहेत. हल्लीच्या सिनेमांमधल्या लोकांना तेवढा जमत नाही अस मत होतं माणासाचं हे जुने सिनेमे पाहिल्यावर. 'काय द्याच बोला'  वगैरे पण चांगले आहेत सिनेमे.. 'एक डाव धोबीपछाड' पण मस्त आहे. 'सिंहासन' पण पहिला मी मध्ये. सगळेजण म्हणतात खूपच छान आहे वगैरे..पण मला तरी ठीक च वाटला.. तसाच तो हा पण.. 'सामना'.. ठीक आहे.. काही ठिकाणी तर कशाचा कशाला आगापीछा नाही कथेत..

घरी असताना रेडीओ वर जी ऐकायचो ती सगळी गाणी इंटरनेटमुळे हल्ली ऐकता येतात. दर शनिवारी सकाळी दादा कोंडकेंच 'अंजनीच्या सुता' लागायचं ते ऐकतो. तसच शाळेत असताना सकाळी 'तुझ्या कांतिसम रक्तपताका' ऐकायचो. सकाळची शाळा होती. तेव्हा बरोबर आंघोळीच्या वेळी लागायचं ते गाणं. काय वर्णन केलाय त्यात! 'पाचुमण्यांच्या किरणांसम हि हिरवी दुर्वादळे'!!  पूर्वी सह्याद्री किंवा आकाशवाणीच्या कृपेने ऐकलेली हि अशी सगळी गाणी ऐकतो आता परत परत. 'कीचकवध' वगैरे नुसती नावं ऐकलेल्या सिनेमान्माधली गाणी पण ऐकता येतात. जुने सिनेमे बघता येतात. ह्या links पहा. इथे गाणी आणि सिनेमा-नाटकांचा खजिना आहे.
गाण्यांसाठी: http://www.aathavanitli-gani.com/index.htm
सिनेमा आणि नाटकांसाठी: http://www.umovietv.com/

ह्याच site वरून पहिला मी आज सिनेमा. जगाच्या पाठीवर मधले संवाद चांगले आहेत. काही काही वाक्य छान आहेत. गाणी तर अप्रतिम आणि आशयगर्भसुद्धा... 'जग हे बंदिशाला','एक धागा सुखाचा', 'विकत घेतला श्याम' वगैरे..   'उद्धवा अजब तुझे सरकार' तर कालातीत गाणं आहे. सगळीच गदिमांची आहेत. सुधीर फडक्यांच संगीत आणि त्यांचाच आवाज. तसच अजून एक छान गाणं म्हणजे रफीने म्हणलेलं. 'कुठे शोधिसी..' तेच ऐकत बसतो आता..  लहानपणापासून मराठी सिनेमे पाहिलेत, गाणी ऐकली आहेत, पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे मराठी साहित्याबद्दल थोडीफार माहिती आहे. त्यामुळे कितीतरी गोष्टी आहेत लिहिण्यासारख्या.. पण आत्ता राहू दे.. नंतर लिहीन कधीतरी..

Sunday, January 6, 2013

Air India च्या सौजन्याने

सिंगापुरी परत आल्यानंतर गेले ३-४ दिवस आम्ही चारही तंगड्या वर करून लोळत पडलो होतो त्यामुळे हे लिहून blog वर टाकण्यास उशीर झाला. हा सर्व प्रकार १ आणि २ जानेवारीला घडला. १ जानेवारीचे रात्रीचे विमानोड्डाण पुढे ढकलण्यात येउन २ जानेवारीच्या रात्री झाले. त्याची हि गोष्ट.


'सुमेध बाळ येई घरा, तोचि दिवाळी आणि दसरा' असे सुट्टीचे दहा दिवस झाल्यानंतर आम्ही सिंगापुरी परत जाण्यासाठी निघालो. (बऱ्याच गाठीभेटी झाल्या. एक लग्न आणि एक साखरपुडा जेवलो. :-) \m/ ) नेहमीप्रमाणे K K Travels च्या गाडीचे बुकिंग केले होते. गाडी बऱ्यापैकी वेळेवर आली. सगळी शीटं भरलीच होती. आम्ही बसल्यावर गाडी निघाली. द्रुतगती मार्गावर मंदगतीने निवांत प्रवास करत आम्ही मुंबई जवळ आलो. त्यानंतर  'वाहतूक मुरम्ब्यातून' बाहेर पडून एकदाचे विमानतळावर पोहोचलो. COEP चे विद्यार्थी कुठेही भेटतात ह्या नियमाला अनुसरून आमच्या गाडीत देखील अजून एक माजी विद्यार्थी होता. मग काय कॉलेज संदर्भात थोड्याफार गप्पा झाल्या. विमानतळावर हीs भलीमोठी गर्दी होती. तिथले सुरक्षाविषयक सर्व उपचार पार पडल्यानंतर आम्ही बोर्डिंगच्या गेटपाशी जाउन वाट बघत बसलो. थोड्या वेळाने  झोप लागली. काय काय स्वप्न पडली ती काही आता आठवत नाहीत. मधेच जाग आली ती सहप्रवाशांच्या आवाजाने. 'विमान थोडं उशिरा निघेल असं म्हणताहेत. म्हणूनच वेळ उलटून गेली तरी बोर्डिंग सुरु नाही झालं अजून', शेजारच्या खुर्चीने माहिती पुरविली. 'बोर्डिंग सुरु झालं कि उठवा' असं सांगून मी परत झोपलो. एकदम काहीतरी गलका झाला आणि जाग आली. आता तर अगदी विमान निघायची वेळ झाली होती. बघतो तर काय.. Air India चे एक काका आणि काकू काहीतरी उद्घोषणा करण्याच्या तयारीत होते. त्यांनी सांगितले कि विमान २४ तास उशिराने सुटणार आहे. कारण काय तर म्हणे वैमानिक आलाच नाही. (शक्य आहे. कारण Air India च्या कर्मचाऱ्यांना गेल्या २-३ महिन्यांचा पगारच मिळाला नसल्याचे नंतर आम्ही ऐकले. त्यामुळे त्या गोष्टीचा निषेध म्हणून तो आणि त्याचे इतर सहकारी आले नसतील). त्यावर एकच गोंधळ सुरु झाला. सगळ्यांनी त्यांना घेराव घातला. आत्ताच्या आत्ता दुसऱ्या वैमानिकाची सोय करा वगैरे वगैरे मागण्या सुरु झाल्या.हे पाहून आम्हास कॉलेजमध्ये इंजिनीरिंगच्या (विशेषतः गणिताच्या) पेपरात मार्कं वाढवून घेणाऱ्या मंडळींची आठवण आली!


तो गदारोळ सुमारे दोन अडीच तास चालला. लोकं कितीतरी वेळ वाद घालत बसली होती. अर्थातच काही उपयोग नव्हता. लोकांनी शिव्या द्यायला, धमक्या द्यायला सुरुवात केली तरीदेखील ते दोघे तसेच मख्ख चेहेरे करून उभे होते. सरकारी कर्मचारी ते! त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे वेळ, शक्ती ह्यांचा अपव्यय!  ते काहीच करत नव्हते. वरिष्ठ मंडळी हॉटेल्स वगैरेची सोय करत असावीत बहुतेक, आणि तोपर्यंत खिंड लढवण्यासाठी ह्यांना पाठवलं असावं. ते काम त्यांनी अर्थातच चोख बजावलं. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे हे नेहमीच होत असतं तेव्हा काळजी करू नका, आम्ही हॉटेल वगैरे ची व्यवस्था करू . (आर आर पाटलांच्या शब्दांत सांगायचं तर 'ऐसे बडे शेहरोंमे ऐसी छोटी मोटी घटनाए होती रेहती है'). नंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये वगैरे चौकशी केल्यावर कळाले कि खरच Air India साठी हे नेहमीचच आहे. त्यामुळे त्यांची हॉटेल्स वगैरे पण ठरलेली आहेत.

शेवटी घसे सुकल्यावर लोकांनी माघार घेतली आणि तमाशा संपला. ब्यागा परत घेणे, बोर्डिंग पास रद्द करणे वगैरे सोपस्कार झाले आणि मग आम्ही गाड्यांमधून हॉटेल्सकडे रवाना झालो. विमानतळाबाहेर आलो आणि गाड्यांकडे जात होतो तेव्हा बाहेर पत्रकार टपलेलेच होते. लग्गेच त्यांनी कॅमेरे सरसावून 'बाईट' साठी 'चावायला' सुरुवात केली. त्यांना फारसा भाव न देता आम्ही निघालो. खूप उशीर झाला होता आणि झोप येत होती. मुंबई मध्ये राहणारी लोकं आपापल्या घरी गेली.


Air India च्या लोकांनी आमची सोय मात्र चांगल्या हॉटेल मध्ये केली होती. जेवण आणि विमानतळावर जाणं येणं  ह्याची सोय पण चांगली होती. सकाळी न्याहारीला फळे आणि पावभाजी होती. जुहु किनाऱ्याच्या अगदी जवळच होतं हॉटेल. त्यामुळे मुंबई चा सुप्रसिद्ध जुहु बीच पहिला. अर्थातच मी एकटाच होतो (इथे एक दीर्घ उसासा! :-D ). बरोबर माझ्याच विमानामधला मित्र होता. तिथे चालणारे सगळे प्रकारही पहिले. ह्यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास इच्छुकांनी 'मुंबईचा जावई' हा जुना मराठी सिनेमा पहावा. जुहु बीच वर शिवाजी महाराजांचे एक स्मारक देखील आहे. नंतर आसपासचा परिसर पहिला. नट-नट्यांचे बंगले त्याच भागात आहेत म्हणे. पण आम्ही काही गेलो नाही.दुपारी जेवण झाल्यावर सुस्ती आली आणि परत झोप काढली.

संध्याकाळी परत जुहु बीच वर फेरफटका मारला. बरोबर विमानातालीच मंडळी होती. एकजण सिंगापूर मध्ये नोकरी करणारा होता. दुसरा नोकरी करता करता NTU मध्ये पार्टटाईम मास्टर्स करणारा होता. तिसरा माझ्याच सारखा NTU मध्ये PhD करणारा होता. चार मराठी माणसं एकत्र जमल्यावर काय होणार.. विविध विषयांवर घनघोर चर्चा झाल्या. कॉंग्रेस, क्रिकेट, पुण्यातली इंजिनीरिंग कॉलेजेस आणि त्यांच्या भरमसाट फिया, बाळासाहेबांच निधन आणि शिवसेना, सिंगापूर मधील नोकर्यांची सद्यस्थिती आणि विशेषतः Air India चा हलगर्जीपणा, NTU, अमेरिका आणि IIT मधील अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती आदी विषयांवर सर्वजण अगदी हिरीरीने बोलले. माझी भूमिका बहुतांश वेळ श्रोता म्हणूनच मर्यादित होती. अधून मधून मी विषय बदलायला किल्ली देत होतो एवढच.

दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या दिवसाची लोकं आणि आम्ही अश्या सगळ्यांची एकाच विमानात सोय करण्यासाठी मोठं विमान मागवलं होतं. त्यामुळे त्या दिवशीचे उड्डाण अजून २ तास उशिरा होणार होतं. दुसऱ्या दिवशीसुद्धा Air India चा सावळा गोंधळ चालूच होता. गेट वर तिकीट तपासून आत सोडणाऱ्या जवानांना आमच्याबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते. आमच्याकडे नवीन तिकीट नसल्याने ते आम्हाला आत सोडेचनात. मग त्यांना सगळं सांगून, पटवून देण्यात परत वेळ गेला. खरतर त्यांना एक सूचना देऊन ठेवायला किंवा तिथे Air India चे अधिकारी ठेवायला काय जात होतं, पण नाही. आत गर्दी पण खूप होती. कारण दोन दिवसांचे सगळे प्रवासी एकदम आले होते. लोकांची आणि कर्मचाऱ्यांची किरकोळ कारणांवरून भांडणं चालू होती. त्यातच अफवा पसरली कि आजच्या विमानात पुरेश्या जागा नाहीयेत. त्यामुळे अजूनच धावपळ, गोंधळ! त्यांना मोठे विमान मागवल्याचे अधिकृतरीत्या सांगायला काय जात होतं, पण नाही.

ह्या सगळ्या प्रकारानंतर एकदाचे बोर्डिंग गेटपाशी गेलो. मग ठरलेल्या वेळी विमानात जाउन बसलो. बसलो आणि मला जी झोप लागली ते थेट विमान उतरायच्या वेळी मला जाग आली. (Air India च्या विमानात जागं राहून फारसा काही उपयोग नसतो. हवाई 'सुंदऱ्या' नसतात. सगळ्या काकवा असतात.) मधेच एकदा एका हवाई सुंदराने जेवण आणले तेव्हा त्यातली फळे खाल्ली एवढंच. विमान उशिरा निघाल्याने उशिरा उतरलं. त्यामुळे मग रूमवर पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. तेव्हापासून नुसता आळस भरलाय अंगात.

जुहु परिसरात फिरताना पाहिलेली Air India ची जाहिरात -