Sunday, January 17, 2016

36. एक गोष्ट


“काSSय?” तो जवळजवळ किंचाळलाच! पलीकडे झोपलेलं कुत्रं जागं होऊन त्यांच्याकडे बघायला लागलं.
“होSS.. तुला माहिती नाही का?” सर्वज्ञ ब म्हणाला.
“नाही! गाढवा! मला कुठून माहिती असणार! ही माहिती कुठून मिळाली तुला?”
“मागच्याच आठवड्यात की.. अरे तो माझ्या क्रिकेटवाल्या मित्राचा आत्तेभाऊ निघाला. त्या दिवशी फोटो काढायला म्हणून त्या मित्राने माझा कॅमेरा नेला होता तेव्हा बोलता बोलता कळालं. मला काय माहिती कि तुला अजूनही एवढी उत्सुकता असेल म्हणून” असं म्हणून ब ने कुत्र्याला लाथ दाखवून हाकललं आणि परत पिशवीतल्या शेंगदाण्यांकडे आपलं लक्ष वळवलं.
हातातली काबुलीची पिशवी शेजारी ठेवून तो समोर लांब खाली दिसणाऱ्या बागेतल्या एका झाडाकडे नजर लावून बसला.



तिसरीपर्यंत एका वर्गात होते ते. त्या वर्षी तिच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली. त्यानंतर ती भेटली ते एकदम बारावीमधेच. वर्षाच्या सुरुवातीलाच वक्तृत्व स्पर्धांसाठीच्या संघनिवडीच्या वेळी ती आली होती. तेव्हा ह्याने ओळखलंच नाही. नावासारखी नावं असतात कि! पण तीच येऊन बोलली आणि मग लक्षात आलं. तेव्हा आपण अगदीच बावळट असल्यासारखं वाटलं होतं त्याला! 

मग कितीतरी वेळ बोलत बसले होते ते. आठ वर्षातल्या सगळ्या गोष्टी सांगत होती ती. वडिलांची बदली परत इथे झाल्यामुळे ती ह्या कॉलेजमधे आली होती. मग अधून मधून भेटायचे ते. तसा फारसा वेळ मिळायचा नाही त्यांना. तो सायन्सला आणि ती कॉमर्सला! त्यात दोघांचेही ग्रुप्स वेगळे! त्याची आयआयटीची तयारी वगैरे सगळं सांभाळून भेटायचे ते. कधी कॉलेजच्या कॅन्टीन मधे तर कधी लायब्ररीजवळ. एक दोन वेळा तो तिला सीसीडी मधे पण घेऊन गेला होता. पण त्याने हे कधी कधी म्हणजे कधी कुणालाही सांगितलं नव्हतं. फक्त ब ला मात्र नंतर सांगितलं, तेसुद्धा तीनेक वर्षांनी!

त्यानंतर तो आयआयटीला गेला आणि त्यांचा संपर्क तुटला. पहिल्या सुट्टीच्या वेळी आल्याआल्या त्याने थोड्याफार ओळखीच्या लोकांकडून माहिती काढली आणि मग कळालं कि ती दुसऱ्या कुठल्या तरी शहरातल्या कॉलेजमधे गेलीये म्हणून. त्यानंतर काहीच नाही. 

आयआयटीनंतर तो अमेरिकेला गेला. मास्टर्ससाठी. जायच्या दोन दिवस आधी ती अचानक भेटली होती. तिच्या कोणत्या तरी मैत्रिणीला भेटायला आली होती. तेव्हा अगदी उडत उडत भेट झाली. तिला पण परत जायची घाई होती आणि त्याला पण काय काय आणायला जायचं होतं. गडबडीत फोन नंबर पण घ्यायचा राहून गेला. त्यावेळी जाताना ती “अजूनही तसाच मंद आहेस” असं का म्हणाली ते त्याला नीट कळालच नाही! 

अमेरिकेत गेल्यावर त्याने फेसबुकवर वगैरे शोधायचा प्रयत्न केला. ती काही सापडली नाही. आता तिथली शिक्षणाची दोन वर्ष आणि नोकरीचं एक असा तीन वर्षांनी तो कालच परत आला होता. आज संध्याकाळी लगेच तो आणि ब टेकडीवरच्या त्यांच्या पूर्वीच्या नेहमीच्या ठिकाणी बसले होते. खालच्या गाडीवाल्याकडून घेतलेली काबुली आणि खारे शेंगदाणे खाता खाता त्याने ह्याच्यावर हा बॉम्ब टाकला होता. सगळ्या लोकांचे गेल्या तीन वर्षातले अपडेट्स देता देता त्याने तिच्याबद्दलही माहिती पुरवली होती. बीकॉम-एमकॉम करून ती कुठल्या तरी शहरात नोकरी करत होती. आता शिक्षण झालं आणि नोकरीही व्यवस्थित चालू होती, त्यामुळे त्याच शहरात मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करणारा एक मुलगा बघून तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं होतं.



“शेवटचे तीन चार दाणे आहेत, हवे आहेत का?” ब च्या प्रश्नाने तो भानावर आला. त्याची काबुलीही ब नेच संपवली होती.
“ठीकेरे.. आता विचार करून काय उपयोग. सोड चल. शाळेपलीकडच्या त्या हलवायाच्या शेजारी एक नवीन टपरीवाला असतो हल्ली. तिथे जाऊयात चल. तिकडे बर्गर वगैरे खात असशील, जरा इथला वडापाव खाऊन बघ. त्याच्याकडच्या वडापावला जगात तोड नाही. त्या कर्जतच्या लोकांना म्हणावं जरा इथे येऊन शिकून जा..” त्याची अशी अवस्था बघून विषय बदलणाऱ्या ब ची बडबड ऐकता ऐकता तो चालू लागला..


टीप: हे सर्व काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाहीये. वाचकांनी तसले कोणतेही प्रश्न विचारण्याची तसदी घेऊन नये. (आज संक्रांत असल्याने टीप गोड भाषेत लिहिली आहे.)
    
  

No comments:

Post a Comment