Saturday, December 20, 2014

27. एका अग्रलेखाची पोचपावती!




मान्नीय संपादक महाशय (‘दुपार’) यांस,
(आता मुख्य संपादक कि पिआरबी कायद्यानुसार जबाबदारी असणारे, ते आपण ‘दुपार’वाल्यांनीच बघून घ्यावे!)

स.न.वि.वि.

आजचा आपला अग्रलेख वाचला, त्याचीच हि पोचपावती. तसे आम्ही नेहमीच (म्हणजे अधून मधून) आपले (आणि इतरांचे देखील – उगाच खोटं का बोला) अग्रलेख वाचत असतो. पण आजचा लेख अगदीच मनापासून आवडला. ‘दहीवराचे दिवस’ वाचून अगदी गहिवरून आले! बऱ्याच काळानंतर असा मुक्तस्वातंत्र्याचा आविष्कार वाचायला मिळाला! (अपवाद: परवाचा जोकसत्तावाल्यांचा अग्रलेख – आपल्या(च!) मान्नीय गवार साहेबांच्या पावलांवर पाउल ठेवून शेतकऱ्यांबद्दल मुक्ताफळे उधळणारा अग्रलेख!) आपले मनापासून अभिनंदन!

तसही आपल्या वर्तमानपत्रात वाचण्यायोग्य गोष्टी शोधाव्याच लागतात! रोज एक मुख्य अंक, आणि दोन पुरवण्या एवढी पाने असूनही आपल्या वर्तमानपत्राला विविध जाहिराती छापण्यासाठी जागा कमीच पडते! पडणारच! शेवटी आपल्याच एका अग्रलेखाप्रमाणे आजकालचे जग हे केवळ मार्केटिंगवर चालते. (तारीख शोधावी लागेल. तारखा लक्षात ठेवण्याचा बाबतीत आम्ही अगदीच ‘हे’ आहोत हे आम्ही मोकळ्या मनाने कबूल करतो.) जाहिराती छापून जागा उरलीच तर मग आपल्या पेप्रात एका पानावर अंधश्रद्धा निर्मुलन विषयक ‘बोधप्रर’ माहिती आणि मागच्याच पानावर तथाकथित बुवा आणि बापूंचे लेख (! कि जाहिराती?) असतात! असो! त्यातही आपले उपसंपादक हे डुलक्या काढण्यातच मग्न असावेत अशीही आमची धारणा आहे. (हा केवळ आपण आजच्याच लेखात वर्णन केलेल्या रंगीत गुलाबी, चटकदार, अनवट, ढिंच्याक अश्या थंडीचा परिणाम असेल असे आपणास वाटण्याची शक्यता आहे, परंतु आमचे मत वेगळे आहे.) आपल्या पेप्रात शुद्धलेखनाच्या इतक्या चुका सापडतात कि आजकालच्या विंग्रजी शाळांमधली मुले देखील ह्या चुका शोधु शकतील! ‘अमृतातेही पैजा जिंके’ अश्या ह्या आपल्या मऱ्हाटी भाषेमध्ये अष्टदिशांना नावे आहेत ह्याची तुमच्या बातम्या लिहिणार्यांना आणि छापणार्यांना कल्पना नसावी ह्याने देखील आम्हाला मागे खेद झाला होता. असो! हे विषयांतर झाले. मूळ विषय वेगळाच आहे. 

तसेही तुमचे वर्तमानपत्र हे एका ‘उद्योग’पतीच्या हातात असल्याने केवळ एका विशिष्ट विचारप्रणालीचे समर्थन करणारे अग्रलेख आणि एका विशिष्ट कुटुंबाचा उदो उदो करणारया बातम्या वाचून आम्ही वैतागलोच होतो!
पण आज आम्हाला अगदी मनापसून आनंद झाला कि कोणीतरी शेवटी ते बंधन झुगारून देऊन आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार दाखवलाच! एरवी आम्ही हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे केवळ दूरदर्शन आणि विविध च्याणेलवाल्यांच्या सवाल-जवाबांमधून ऐकले होते! (हो हो.. केवळ ऐकलेच होते. ते तिथे कधी बघायला मिळतच नाही! कारण, आधीच आपण कोणत्या बाजूला झुकते माप द्यायचे हे ठरवून यायचे आणि स’माज’वादी आणि ‘सिक्युलर’ अश्या पूर्वग्रहदूषित व्यक्तींना चर्चेसाठी (?) बोलवायचे आणि कोणी एखादा दुसर्या बाजूने बोलायला लागला किंवा संतुलित मते मांडू लागला तर त्याला गप्प करायचे, हीच ‘वागळी’ नीती अवलम्बणाऱ्या कार्यक्रमांमुळे आम्ही आजकाल ‘तसे’ कार्यक्रम बघणेच बंद केले आहे. त्यापेक्षा ‘होणार जावई मी त्या घरचा’ वगैरे कार्यक्रम बरे!)

अग्रलेख हे समाजाचे प्रबोधन वगैरे करणारे असावेत अशी पूर्वीच्या (पक्षी: इतिहासजमा) संपादकांची धारणा होती. ती बुरसटलेली, जुनाट विचारसरणी सोडून देउन मागच्या आणि सध्याच्या पिढीच्या संपादकांनी ‘मालकाच्या’ पुढे पुढे करण्याचे आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे अग्रलेख लिहिण्याचे धोरण अवलंबले होते. (त्यांनी बहुदा HMV – उसके मालिक कि आवाज - वाल्यांकडून स्फूर्ती घेतली असावी!) आपण मात्र एक नवाच पायंडा घातलात! नाहीतरी ते इतिहासजमा संपादक उगाचच सरकारला शिकवायला जायचे! ‘म्हणे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ काहीतरीच उगाच आव आणायचा!

पण आपण मात्र कमाल केलीत! आजचा आपला थंडीवरचा लेख वाचला आणि मन त्या रम्य अश्या भूतकाळात गेले! शाळेत आठवी नववीत असताना आम्हीदेखील असेच निंबंधं लिहित असू! (आम्हाला १५ पैकि १२-१३ मार्क मिळत असत! तसेच लेख लिहिणे आम्ही चालू ठेवले असते तर आज आम्हीदेखील संपादक किंवा गेला बाजार स्तंभलेखक तरी झालो असतो! परंतु आपल्याच पेप्रातील ‘सुप्तपीठा’त लेख लिहिणे मात्र अवघड आहे. लुना, मांजर, कोंबडी इत्यादी लेख वाचल्यानंतर आमची तेवढी प्राज्ञा नाही!)

अहाहा! काय तो अग्रलेख! ‘हल्ली पहिल्यासारखी थंडी पडत नाही’ असे वाक्य पहिल्याच परिच्छेदात टाकून आपण पुलंचे साहित्य वाचत असल्याचे आपण कसे ‘सटली’ सुचवले आहे! आपल्या (जय) महार्ष्ट्रातल्या विविध शहरांचा उल्लेख करून आपण कसा खुबीने प्रादेशिक समतोल साधला आहे! शहरांबरोबरच खेड्यामधील देखील वर्णन केले आहे! थंडीमधील तरुणाईचे देखील काय ते वर्णन! आधुनिक थंडीबरोबरच जुन्या थंडीचेदेखील कसे ठसकेबाज वर्णन केले आहे! अहाहाहा! काय तो भाषाविलास! काय ती अलंकार-योजना! काय उपमा! (लेखामधील! खायचा उपमा नव्हे!) आता आजचा आपला हा लेख वाचून काही लोक म्हणतील कि आज अग्रलेखाच्या जागी चुकून ‘ललित’ स्तंभासाठी आलेला लेख छापला कि काय! आम्ही आधीच म्हणल्याप्रमाणे आपले उपसंपादक हे झोपा काढतात असं लोकापवाद असल्याने असा ‘वहीम’ येणे स्वाभाविक आहे! पण आम्हास मात्र आपला लेख जाम आवडला! सक्काळी सक्काळी पोहे आणि चहा घेताना आम्ही तो मिटक्या मारीत वाचला!

काही लोक काहीही म्हणून देत, आम्हाला मात्र फार्फार आनंद झाला! इतका, कि आम्ही आमच्या चाळीच्या महिला मंडळाच्या नियतकालिकाच्या संक्रांत-विशेष अंकासाठी - ‘आपले सण आणि उत्सव’ साठी - लेख लिहिण्यासाठी विशेष आमंत्रण देण्याचे निश्चित केले आहे. (होय होय! आम्ही चाळीत राहतो. चाळींचा ठेका काही फक्त मुंबैवाल्यांनी घेतलाय काय? पुण्यात देखील चाळी आहेत!) आपल्या विद्वत्तापूर्ण आणि अलंकारिक भाषाशैलीमधील लेखाचा लाभ होणार म्हणून (आपल्या) सर्व माता-भगिनी खूष आहेत! काहींनी  आपल्या आजच्या लेखाचे कात्रण काढून ठेवून सहस्रवाचन करण्याचे ठरवले आहे! (आम्हीदेखील आजच्या लेखाचे कात्रण जपून ठेवणार आहोत. बाकीच्या जाहिरातींच्या पानांचा सदुपयोग उद्या सकाळी होईलच!) आपल्या लेखासाठी आम्ही हा विषय सुचवत आहोत – ‘whatsapp मधील निळ्या चिन्हांचे फायदे आणि तोटे’!

काहो? विषय वाचून चमकलात का? अहो नियतकालिकाचा विषय आणि आतील लेखाचा विषय ह्याचा संबंध असणे गरजेचे आहे असे आम्हास वाटत नाही! किमान आजचा आपला अग्रलेख वाचून तरी आम्हास तसेच वाटले. अग्रलेख हा समाजप्रबोधन करणारा असावा ह्या जुनाट विचारसरणीला तिलांजली देणार्यांपैकी तुम्ही! तुम्ही आमच्या माता-भगिनींचे हे आग्रहाचे ऐकलेच पाहिजे!

आपल्या लेखाची वाट बघतोय!

आपलाच नम्र वाचक!  
    

1 comment: