Thursday, May 1, 2014

25. 50 डॉलर्स अक्कलखाती जमा!



(ह्यातला बराचसा भाग हा concert मधे बसून लिहिलेला आहे. उर्वरित भाग आत्ता परत आल्यावर पूर्ण केला.)
ए. आर. रेहमानच्या concert ला student discount मिळाला म्हणून ५० डॉलर्स देऊन गेलो. भयंकर पचका झाला! निम्मी concert झाली आहे. ३-४ गाणी वगळता सगळी तमिळ गाणी आहेत. म्हणून पचका! आणि पैसे अक्कलखाती जमा कारण आम्ही असं गृहीत असं धरलं होतं कि हिंदी आणि तमिळ  दोन्ही भाषांमधली गाणी असतील, पण हिंदी थोडी जास्त असतील. पण आता माझं मत सांगायचं तर ह्या concert ला येणं हा शुद्ध गाढवपणा झाला.
      आता लोकं म्हणतील कि आधी चौकशी करून काय झालं होतं म्हणून, पण तेच ना.. थोडीफार चौकशी केली होती आणि असं कळालं होतं कि मुख्यत्वेकरून हिंदी गाणी असतील. असो आमचाच मूर्खपणा दुसरं काय!
      एक खटकलेली गोष्ट अशी कि त्याची अनेक गाणी हि २-३ भाषांमध्ये आहेत. एकच चाल, पण २-३ भाषांमधील बोल. (अर्थात बरचसं क्रेडीट गीतकारांना कि ते एका भाषेतल्या गाण्याची चाल ऐकून दुसऱ्या भाषेतल्या गाण्यासाठी बोल लिहितात!) तर मुद्दा असा कि तमिळ गाणे गाताना त्या गाण्याचं हिंदीमधील किमान एक कडवं (आणि अगदीच काही नाही तर किमान २ ओळी तरी) गाता आल्या असत्या , पण तसं झालं नाही! आमचा पोपट झाला!
      आता अजून एक मुद्दा असा कि लोकं म्हणतील कि गाणं कुठल्याही भाषेतला असो, नीट शांत बसून ऐकायला, enjoy करायला काय जातंय म्हणून.. असं नाही कि आम्ही सगळ्याच गोष्टींना नावं ठेवतोय.. काही गाणी (बोल काळात नसूनही) आम्ही enjoy केलीच.. पण जर बोल न कळणाऱ्या गाण्यांचा भडीमार व्हायला लागला तर मग काय ना.. आणि नुसतच संगीत ऐकायचं असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. एखाद्या गाण्याची मजा जास्त तेव्हा येते जेव्हा त्याचे बोल कळतात आणि अर्थ समजतो! म्हणूनच गदिमांच एखादं गाणं जर एखाद्या मराठी न कळणाऱ्या माणसाला ऐकवलं तर तो कंटाळणारच ना! त्या गाण्यातल्या भावना ह्या आपल्याला कळतात, त्याला त्या enjoy कशा करता येणार? आता हेच बघा, “जे वेड मजला लागले..” किंवा “राजहंस सांगतो..” किती सुंदर आहेत हि गाणी आणि किती छान बोल आहेत ह्या गाण्यांचे! नुसता गाणं ऐकायला पण छान वाटेल, पण एखादा माणूस त्या भावना नीट तेव्हाच समजू शकेल जेव्हा त्याला त्या गाण्याचा अर्थ समजेल, त्याला नळ-दमयंती कथेचा संदर्भ कळेल..! आणि समजा अशी नीट न कळणारी अनेक गाणी त्याला ऐकवली तर त्याची काय अवस्था होईल!
      तर सारांश हा कि आमचे पैसे अक्कलखाती जमा! स्वदेस, रांझणा, रॉकस्टार ह्या सिनेमांनी आणि ख्वाजा ने हात दिला म्हणून जरा बर! ARR concert अगदीच ARRRRR concert झाली..!
(जाता जाता २ गोष्टी. त्यातली दुसरी गोष्ट अशी कि आपल्याकडे लग्नात नवरी मुलगी किंवा ‘येत्या एक-दोन वर्षात कर्तव्य असलेली’ एखादी करवली जितक्या वेळा कपडे बदलत नाही त्यापेक्षा जास्त वेळा तो कपडे बदलत होता. अर्थात त्याला आमचा काहीच आक्षेप नाही. फक्त सांगितलं. आणि पहिली गोष्ट अशी कि आम्ही असं ऐकलं कि बऱ्याचश्या गाण्यांच्या वेळी तो लिप-सिंक करत होता!!!)  
        

No comments:

Post a Comment