Sunday, May 5, 2013

14. जांभूळ (Jambhool)


माणसाची पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात. दुपारच्या स्वप्नांबद्दल तसं काही ऐकलं नाहीये. खरी होत असतील तर आम्हाला आनंदच होईल. आज वामकुक्षीच्या वेळी आम्हाला आम्ही जांभळे खात असल्याचे स्वप्नं पडले. आम्हाला सर्वच फळे आवडत असली तरी जांभूळ विशेष प्रिय आहे. जीभ, ओठ आणि दात पूर्ण निळ्या-जांभळ्या रंगाचे होईपर्यंत आम्ही जांभळे खातो. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही दारावर येणाऱ्या हातगाडीवाल्याची, पावसाची वाट बघणाऱ्या चातकाच्या आतुरतेने वाट बघायचो. नंतर सायकल चालवता यायला लागल्यावर आम्ही गावात जाता येताना रत्नदीपच्या समोर उभ्या असणाऱ्या हातगाडीवाल्याकडून जांभळे आणत असू. काय मस्त रसरशीत टपोरी जांभळे मिळायची त्याच्याकडे! (‘मिळायची’ असे म्हणण्याचे कारण असे कि सिंगापुरी आल्यापासून त्या हातगाडीवाल्याबद्दल काही खबर नाही.) आमच्या गावी गेलो कि शेतातल्या झाडावर चढून आम्ही जांभळे काढतो आणि तिथेच बसून फस्त करतो. engineering चालू असताना आमचे मित्रवर्य राजेंद्र भोर ह्यांनी त्यांच्या घरची जांभळे दिली होती. अगदी अप्रतिम होती! आम्ही त्याच्या मागे लागून मोठ्ठी पिशवी भरून जांभळे घरी नेली होती. आणि त्याने अगदी छान पद्धतीने ती आणली होती. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आत पानांमध्ये ठेवून त्याने आणली होती. मित्र असावा तर असा! आम्ही त्याच्याकडून एवढी जांभळे नेली कि आमच्यासारख्या जांभूळप्रिय माणसालादेखील ती संपेनात. नंतर आईने उरलेल्या जांभळांचा जाम केला.  

कालच घरी बोलताना आई असं म्हणाली कि सोनालीने जांभळे आणली आहेत. त्यामुळे बहुदा आज स्वप्नं पडलं असावं. आता राजेंद्रला दम दिला पाहिजे कि आम्ही पुण्यात येऊ त्यावेळी आमच्यासाठी घरची जांभळे घेऊन ये म्हणून. इथे सिंगापुरात तरी कुठे जांभळे दिसली नाहीत अजूनपर्यंत. सिंगापुरातील वाचकांना नम्र विनंती कि जांभळे कुठे मिळतील हे आपणास ठाऊक असल्यास अवश्य कळवावे!  

जांभूळ हे संस्कृत वैद्यान्नादेखील प्रिय आहे कारण त्यातून लोह मिळते. डायबेटीस असणाऱ्या लोकांनी जांभूळ आवर्जून खावे असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे पुण्यामध्ये गेल्या काही वर्षात जांभळाचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. (श्री बालाजी तांबे ह्यांची सकाळ मधे येणारी ‘फ्यामिली डॉक्टर’ हि पुरवणी सुरु झाल्यापासून पुण्यात सगळ्या फळांचे भाव प्रचंड वाढले आहेत.)

बाकी जांभळे हि फक्त आम्हालाच प्रिय आहेत असे नाही तर संस्कृत साहित्यात देखील जांभळांचा ठिकठिकाणी उल्लेख आहे. उन्हाळा-पावसाळा निसर्गवर्णन करताना सर्वत्र जांभळांचा उल्लेख येतो. कालिदासाचा यक्ष आपला संदेश त्याच्या प्रियेकडे नेणाऱ्या ढगाला त्याच्या मार्गाचे वर्णन करताना म्हणतो कि विन्ध्य पर्वताच्या इथे नर्मदा नदीच्या काठी तुला गर्द पिकलेल्या जांभूळराया दिसतील. असाच कालिदासाचा सुप्रसिद्ध श्लोक म्हणजे ‘जम्बुफ़लानि पक्वानि’. आमच्या साठे डॉक्टरांनी एकदा बोलताना जांभळांचा विषय निघाल्यावर लग्गेच हा श्लोक म्हणून दाखवला होता.   
जम्बुफ़लानि पक्वानि| पतन्ति विमले जले|
तानि मत्स्या: न खादन्ति| जालगोलकशङ्कया||
ह्याची अशी आख्यायिका आहे कि ३ अत्यंत गरीब कवि पहिले ३ चरण तयार करून राजाकडे गेले. त्यांचा चौथा चरण होता ‘जलमध्ये डुबुक डुबुक’. पण हा चरण काही राजाला आवडला नाही. मग ते तिघे कालीदासाकडे गेले. त्याने चौथा चरण बदलून दिला आणि मग त्या चरणासकट पुन्हा हा श्लोक ऐकवल्यावर राजाने खूष होऊन त्यांचा सत्कार केला. मराठीमध्ये देखील स्मिता पाटील फेम ‘जैत रे जैत’ मधे एक गाणं आहे: ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती’. ‘जांबुवंताचे नाव देखील जांभळामुळेच पडले असेल?’ का असा प्रश्न आम्हाला पडला आहे. कदाचित तो जिथला राजा होता तिथे अनेक जांभूळराया असतील.

असो. आता हे जांभूळपुराण इथेच थांबवतो. आमच्या इथल्या prime मधे जांभळे काही मिळत नाहीत, पण किमान द्राक्षे तरी घेऊन येतो. आत्ता मधे आमचा इथला मित्र - विशाल - नाशिकला त्याच्या घरी जाऊन आला. तेव्हा त्याने घरच्या मळ्यातली द्राक्षे आणली होती. मस्त होती. आता अजय जाणार आहे. त्याला सांगितला पाहिजे येताना आणायला.

1 comment: