Friday, April 17, 2015

32. झेंडूचे फूल - हे भलते अवघड असते!

हे भलते अवघड असते

मित्राच्या पार्टी मध्ये कुणी ओळखीचे नसताना
रात्रीच्या वेळी आणि बोर होत असताना
तुम्ही केविलवाणे बसता (२),
अन् कोणी 'एकटे' नसते!

'चल, निघुया येथून आता',
मन कंटाळूनिया म्हणते
इतुक्यात दिसे ती बाला (२)
पाउल पुढे ना पडते!

पाहुनी गोड तो चेहरा
मन विरघळून कि जाते
पण धीर होत नसल्याने (२)
घोड्याचे गाडे अडते!

"ए ओळख दे रे करुनी", दोस्तीची आण मित्राला
अन् 'हाय, हेलो' च्या भोवती संभाषण सुरु होताना
मैत्रीच्या मार्गावरुनी (२)
मग गाडी सुसाट सुटते!

विषयांना नाही तोटा,
बोलणे अनावर होते
जुळतील येथल्या तारा (२)
हे एका क्षणात पटते!

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'भावा, कधी गावा येशील का तू'
तुम्ही सबबी देऊन काही, काढता पाय मग घेता,
एकांती दीर्घ उसासा (२)
अन् पुन्हा कि मग 'जैसे थे'!


----------------------------

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'मजला कळतात तुझे रे हेतू'
ती हसुनी निघून जाते, जाताना नंबर देते,
निघताना पार्टीमधूनी, चेहेऱ्यावर हास्य कि खुलते!