ठीक सात वाजता तो दवाखान्यात शिरला. त्याला पाहताच रिसेप्शनिस्टच्या कपाळाला आठ्या पडल्या असं त्याला वाटलं.
“डॉक्टरकाकांना सांगा मी आलोय म्हणून.” तो तिला म्हणाला.
त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून ती नुसतच “हुं” असं म्हणाली.
आतला पेशंट बाहेर आला. पुढचा पेशंट आत सोडताना पडदा बाजूला करून तिने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर काहीतरी म्हणाले. ती ह्याला म्हणाली “अजून दोन पेशंट आहेत अपोइंटमेंट घेतलेले. त्यानंतर जा.”
तिने ‘अपोइंटमेंट घेतलेले’ ह्यावर जोर दिल्याचं त्याला जाणवलं. इथेही अपमान! रस्त्यामध्ये कोणी ओळख देत नाही! सारसबागेतही देवळात रांगेत उभं राहावं लागतं! काय चालू काय आहे! लोकांना कळत कसं नाही! इतकी साधी गोष्ट! चेहेरा बघितल्याबरोबर लगेचच लक्षात यायला पाहिजे खरं तर! छे! छे! किमान डॉक्टरकाका तरी! खरं तर आता त्याला त्यांच्याबद्दल पण विश्वास वाटेनासा झाला होता. ‘ठीक आहे. आज काय तो सोक्ष मोक्ष लागेलच!’ हातातली पिशवी चाचपून तो खिडकीतून बाहेर बघू लागला. समोर दगडूशेठला दर्शनाच्या रांगेत बरीच लोकं होती.
“जा रे आत.”
त्याची तंद्री भंग पावली. पडदा बाजूला करून तो आत गेला.
“ये. बैस. चहा घेणार का?”
“हो. चालेल.”
“अग नंदिता, त्या खालच्या अमृततुल्यमधे चहा सांग, आणि तू पण घेऊन ये.”
ती गेल्यावर ते म्हणाले. “मुद्दामच पाठवलं तिला. आता बोल तू मोकळेपणाने. कसं चालू आहे सध्या? बऱ्याच दिवसांनी आलास.”
“डॉक्टरकाका, खरं सांगा मला. असं कसं असू शकतं? कुणालाच कसं लक्षात येत नाही! चेहेरा बघितल्यावरसुद्धा? अहो खरच सांगतोय मी. ती कागदपत्रं पाहिली मी. पर्वतीच्या देवळातल्या चित्राचा हा फोटो काढलाय बघा मोबाईल मधे. चित्रातला चेहेरा बघा आणि माझा चेहेरा बघा!”
“अरे नारायण, अजूनही तेच का? मला वाटलं दीड-दोन महिन्यात जरा सुधारला असशील. हे काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहेस! फक्त तुझं नाव नारायण आहे. पुनर्जन्म वगैरे काही नसतो रे.”
“डॉक्टरकाका तुम्हीसुद्धा? अहो पुरावा दाखवतोय मी तुम्हाला! हा बघा माझा चेहेरा आणि हा त्यांच्या चित्राचा फोटो! शेंबडं पोर सुद्धा सांगेल. माझं नाव सुद्धा नारायण आहे! बाबांना घरी सगळे नाना म्हणायचे!”
“हो. आम्ही मित्र पण त्याला नानाच म्हणायचो. हे बघ नारायण, नाना हा माझा अगदी जवळचा मित्र. म्हणूनच त्याने मृत्युपत्रातसुद्धा तुझी आणि तुझ्या मोठ्या भावाची जबाबदारी माझ्यावरच टाकली होती. नाना कॅन्सरने गेला. चार महिन्यांपूर्वी तुझा मोठा भाऊ अपघातात गेला. आता तू हे असं करतोयस. नीट वाग जरा. जबाबदारी ओळखायला शिक. वडिलकीच्या नात्याने सांगतोय ते ऐक जरा. जरा व्यायाम वगैरे कर. तब्येत नीट कर. कामात लक्ष घाल जरा. नानाने एवढी मेहनत करून सगळा बिझनेस उभा केलाय तो बघायचा सोडून हा काय वेडेपणा! तरुण मुलांनी तब्येत आणि काम ह्याकडे लक्ष द्यावं. हे काय म्हाताऱ्यांचे उद्योग करत बसला आहेस. ते इतिहास वगैरे सोडून दे. सारखं काय त्या मंडळात जाऊन ते जुने पुराणे कागद वाचत बसतोस. मला तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत!”
“वाटलंच होतं मला! तुम्ही हे असं म्हणणार. मला वेडा ठरवयाचाच अवकाश ना.. मग आमची सगळी इस्टेट घशात घालायला मोकळे तुम्ही. आत्ता ट्रस्टी आहातच!”
“मूर्खा! काय बरळतोयस तुझं तुला तरी कळतंय का..”
“चांगलंच कळतंय! तुमचं कारस्थान माहितीये मला. पण हा राघोबादादा ह्या नारायणाला नाही फसवू शकणार! इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही मी! मी इतिहास बदलणार!”
त्याने पायाशी ठेवलेल्या पिशवीतून सुरा बाहेर काढला आणि डॉक्टरांवर वार केला. त्यांनी तो चुकवला आणि त्याला धक्का देऊन ते दवाखान्याच्या बाहेर पडले. तो भिंतीवर जाऊन आपटला. स्वतःला सावरून तो त्यांच्यामागे धावू लागला. ते जिना उतरून रस्त्यावर पोहोचले होते. त्याला जिन्यावरून येताना पाहून ते भराभरा रस्ता ओलांडायला लागले. तो दरवाजा ओलांडून बाहेर पडणार तेवढ्यात नंदिता समोर आली. तिला धक्का देऊन तो रस्त्यावर येऊन डॉक्टरकाकांना शोधायला लागला. ती जोरात किंचाळली. डॉक्टरकाका रस्ता ओलांडताना दिसले. तो सुरा उगारून त्यांच्यामागे धावला. त्याच्या हातातला सुरा बघून ती अजूनच जोरात ओरडायला लागली.
डॉक्टरांनी मागे वळून पाहिलं. तो सुरा उगारून त्यांच्या मागे धावत होता. अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. तो आलाच! वाकून आता तो त्यांच्यावर वार करणार.. त्यांनी डोळे मिटले..
पण त्यांच्यावर वार झालाच नाही. कोणीतरी त्यांना हात देऊन उठवलं. ते अगदी सुन्न झाले होते. काहीच कळत नव्हतं.
समोरच्या माणसाने त्यांना पलीकडच्या हॉटेलच्या बाकड्यावर बसवलं. पाणी दिलं. त्याच्या हातात पिस्तुल होतं. तेवढ्यात बरीच लोकं जमा झाली होती. नारायण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दोन पोलीस उभे होते त्याच्या बाजूला.
त्यांनी समोरच्या माणसाकडे पाहिलं. तोच म्हणाला “मीच गोळी मारली त्याला. देवळाबाहेर ड्युटीवर होतो मी. खरं तर पायावर गोळी मारत होतो, पण तेवढ्यात वाकला तो, आणि थेट डोक्यात बसली गोळी.”
म्हणजे बिनपोशाखातला पोलीस होता तो!
“वेड लागलं होतं त्याला! काका काका म्हणत जीव घेत होता तो माझा! माझा जीव वाचवलात तुम्ही! थ्यांक्यू.. अं..”
“मी इन्स्पेक्टर गारदे”
--------------------------------------------------------------------
Robert Bloch च्या ‘The man who looked like Napoleon’ या कथेवरून.