Thursday, February 14, 2013

11. डायरी

आम्ही कधी डायरी वगैरे लिहित नाही. लहानपणी लोकं सांगायची कि डायरी लिही म्हणून. त्याचे फायदे असतात म्हणा.. अक्षर सुधारतं, दिवसभराचा आढावा घेतला जातो, आपण आज काय केलं हे आठवताना आपल्या कृतिन्मागचे हेतू लक्षात येतात, चुका लक्षात येतात वगैरे वगैरे.. पण आम्ही कधी 'असले' धंदे केले नाहीत. काही लोकं अगदी नेमस्तपणे रोज लिहितात.
आम्ही जर डायरी लिहित असतो, तर त्यात काय लिहीलं असतं ह्याची हि झलक.. हे जरी आजच्या दिवसासाठीच म्हणजे १४ तारखेसाठीच असलं आमच्या सध्याच्या दिनक्रमाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे..


14 Feb:
सकाळी उठलो. आज रोजच्यापेक्षा १० मिनिटं लौकर उठलो!! त्यामुळे निशांतचं आवरून होईपर्यंत परत झोपलो. मग आवरून वगैरे lab मध्ये गेलो. आडकर काकांनी आणलेल्या शर्टाची आज घडी मोडली. थोडा वेळ काम आणि मग थोडा वेळ timepass केला. खूप भूक लागली होती म्हणून आज लौकर म्हणजे १२ वाजताच जेवायला गेलो. आज पण Komala's मध्ये गेलो. तिथे chapati plate घेतली. जेवण करून lab मध्ये परत आलो. university मध्ये नुसता गोंधळ चालू होता. लोकं गुलाब आणि फुगे वगैरे घेऊन हिंडत होती!! simulation लावलं आणि अर्धा पाउण तास झोप काढली. आज दिवसभर पाउस पडत होता. झोप झाल्यावर मग hot chocolate घेतलं. मस्त पाउस पडत होता. तो बघत बघत hot chocolate प्यायलो. मग परत थोडा वेळ कामाचं पाहिलं. सुमितला ती indigo वाल्यांची mail forward केली. त्याला बुकिंग करायचं होतं.

साधारण साडेपाचला रूमवर परत आलो. कंटाळा आला होता म्हणून मग black hawk down नावाचा सिनेमा पहिला. चिवडा, लाडू, वड्या, फुटाणे असं खाल्लं. परवाच घरून मामाबरोबर parcel पाठवलं आहे. त्यामुळे गेले दोन दिवस स्वयंपाक बंद आहे. त्याच सगळ्या गोष्टींवर ताव मारणं चालू आहे. मगाशी जेवणात पण गुळाच्या पोळ्या होत्या :-) मग रोजच्यासारखा थोडा वेळ चालायला गेलो. घरी फोन केला. सानिकाने घेतला. ती रुमालांच्या घड्या करत बसली होती वाटतं. मग आज शाळेत काय झालं वगैरे सांगितलं आणि 'घे फोन, तुझा मुलगा आहे' असं म्हणून तिने आईकडे दिला. :-D 

आज अजूनपर्यंत तरी entc च्या whatsapp group वर विशेष असं काहीच झालं नाही. busy असतील सगळे.. ;-)
असो.. आता झोपीन. कामांची यादी केली पाहिजे. मलेशियाचा visa काढायचा आहे. पुढच्या आठवड्यात सरांना भेटलं पाहिजे. थोडं कामाचं ठरवलं पाहिजे. कौशिक म्हणाला तर त्याच्या त्या headphones च्या experiment साठी जावं लागेल. रविकिशोरला badminton च बुकिंग मिळतंय का बघायला सांगितलं पाहिजे. शनिवारी किंवा रविवारी चादरी आणि पांघरूणं धुतली पाहिजेत. टेबल पण आवरायचय.. पण आत्ता आता फक्त लौकर झोप यायला पाहिजे. नाहीतर उद्या उशीर होईल...

Tuesday, February 12, 2013

10. मेघदूत : स्वैर भावानुवाद २ (Meghadoot - 2)

आज संध्याकाळी मस्त वातावरण होतं.  त्यावेळी मेघदूताच्या पुढच्या ९ कडव्यांचा हा भावानुवाद केला आहे. मूळ काव्य कडवे क्र १४ ते २२.
ता. क.- मावशीकडून आत्ताच अशी बातमी मिळाली कि 'प्रोजेक्ट मेघदूत' वाले लोक (मयुरेश प्रभुणे त्यांचे leader आहेत) मागच्या वर्षी मध्यप्रदेशापर्यंत जाउन आले. आता ह्यावेळी सौराष्ट्राच्या दिशेला जाणार आहेत.



(पूर्वमेघ)

तू वाऱ्यावर, आरूढ होता, चकित सिद्धांगना त्या
पर्वतशिखरच, उडते काय?, भासते लोचनांना
उत्तरमार्गी, ओलांडून जा, जमीन बांबूवनांची
शीघ्रगती परी, धडक टाळ बघ, स्वर्गधारी गजांची ।।१०।।

इंद्रधनुष्य, दिसेल मनुजा, असता रविप्रकाश
वारुळातुनि, बाहेर येई, (जणू) मणि-(रत्न)खड्यांचा प्रकाश
तुझी सावळी, काया उजळे, सप्तरंगात साजे
मोरपीस जणू, श्रीकृष्णाच्या, मस्तकावर विराजे ।।११।।

तुझ्या कृपेने, पिकते धान्य, जाणुनी हे मनात
कृषकपत्नी, होति आतुर, पाहण्या तुज नभात
नांगरणीने, आसुसलेली, शांतवून जमीन
उत्तरेस जा, पुनरपि वेगे, पश्चिमेस वळून ।।१२।।

विश्रांती घे, आम्रकूटी, दमशील अतिप्रवासे
विझविसी वणवे, स्मरतो मनी, होई टेकू तयाते
उपकारांचे, अधमानेही, स्मरण नेहमी करावे
उच्च कूळ मग, आम्रकूटाचे, काय वर्णन करावे? ।।१३।।

स्वागत तुझे, करी सुगंधे, मित्र तव आम्रकूट
पक्व-गर्द, आमराईंचे, शुभ्र पर्वत-उतार
स्थिरावता तू, पर्वतशिखरी, दृश्य गमले झकास
हेवा वाटे, अप्सरांना, पाहुनी (तो) भू-उरोज ।।१४।।

भिल्लीणिन्च्या, आश्रयरानि, पळभरी वृष्टी करशी
पर्जन्याने, रिता होऊनी, मग कसा वेगे पळशी
विन्ध्यतळाशी, खडकांमधुनी, वाहते नर्मदा कि
जणू हत्तींच्या, अंगावरती, रेखिली शुभ्र नक्षी ।।१५।।

हत्तींच्या क्रीडेने जिचे, पाणी गंधीत होई
जिस पिकलेल्या, जांभूळराया, अडविति ठाई ठाई
ऐशा नदीचे, प्राशिता जळ तू, पवन नच रोखी तुजला
गौण ठरते, इथे रिते अन्, मान्यता पूर्णतेला ।।१६।।

कळ्या कोवळ्या, खाती हरणे, डोलति अलि सुपुष्पी
पाउस गंधित, करे तप्तभू, (जी) हुंगिती मत्त हत्ती
तुझ्या स्वागता-साठीचा तो, ऐकुनि मयुर-आरव
अवघड होईल, निघणे तुझे, दाटुनि येती भाव ।।१७।।

मेघदूत : स्वैर भावानुवाद १ ची link : http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/02/9-1.html

Saturday, February 9, 2013

9. मेघदूत : स्वैर भावानुवाद - 1 (Meghadoot - 1)

पुराकविना गणनाप्रसंगे, कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा
अद्यापि तद्तुल्यकवेरभावात्, अनामिका सार्थवति बभूव

असं ज्याचं वर्णन केलं जातं असा कालिदास आणि मंदाक्रांता वृत्तामधलं त्याचं काव्य मेघदूत ह्याबद्दल माधव ज्युलियन म्हणतात -

मेघांनी हे, गगन भरता, गाढ आषाढमासि 
होई पर्युत्सुक विकल तो, कांत एकांतवासी
तन्नि:श्वास, श्रवुनि रिझवी, कोण त्याच्या जिवासी
मंदाक्रांता, सरस कविता, कालिदासी विलासी

मेघदूताबद्दल फार ऐकून होतो. असही वाचलंय कि कालिदास हा हवामानशास्त्रज्ञ होता आणि मेघदूतामध्ये यक्ष त्या ढगाला ज्या रस्त्याने जायला सांगतो, 'इथे आलास कि खाली उतर,विश्रांती घे', 'तू इतक्या काळानंतर इथे असशील, तिथे अशी दृश्ये असतील' वगैरे जे वर्णन आहे तो मान्सूनच्या वाऱ्यांचे प्रवाह आणि मार्ग याप्रमाणे आहे. त्यामुळे देखील मेघदूत वाचण्याची फार इच्छा होती. (मध्ये पेपर मध्ये बातमी होती कि 'प्रोजेक्ट मेघदूत' ह्या नावाने मेघदूताप्रमाणे मान्सूनची प्रगती तपासण्यासाठी एक प्रकल्प सुरु केला आहे म्हणून. पण त्याच पुढे काय झाल माहिती नाही.)

मागच्या वर्षी गप्पांच्या ओघात विषय निघाला आणि मग शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेलं मेघदूताचं पुस्तक रसिकाने मला भेट म्हणून दिलं. तिने ते पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं होतं त्यामुळे घरी जाउन आल्यानंतर मी ते अधाश्यासारखं वाचून काढलं. अप्रतिम आहे!

हा अनुवाद वाचण्याआधी संस्कृतमधील चरण वाचून थोड्याफार प्रमाणात मेघदूत वाचलं होतं. गाडगीळ सर आणि जोशी बाई ह्यांच्या शिकवण्यामुळे माझ्या अल्पमतिला थोडफार कळलंहि होतं. अनुवाद वाचून खूपच खूश झालो. आज दुपारी इच्छा झाली म्हणून काही कडव्यांचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. नीट कळले नाही तिथे इंग्रजी व मराठीमधिल अनुवाद वाचले. (शब्दधातुरुपावलि घेऊन बसलो तर ह्या इतर अनुवादांची मदत घ्यावी लागणार नाही बहुतेक).

हा अनुवाद अगदी प्रत्येक श्लोकाप्रमाणे आहे असे नाही. तसेच हा स्वैर भावानुवाद आहे. 'साधारणपणे तसं' वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी वृत्त अगदी नेमकेपणाने जमले नसले, तरी शब्दांचा उच्चार ते वृत्तात बसवण्यासाठी म्हणून त्या लयीत केला तर बसतात. मेघदूताच्या पहिल्या १३ कडव्यांचे रुपांतर आज केलं आहे.

तुम्हा सर्वांना हा प्रयत्न आवडेल अशी अशा आहे.


इथे ह्याचे recording  ऐकता येईल. चिन्मयने ह्या video साठी मदत केली.




पूर्वमेघ

सेवेमध्ये, धनपतिच्या, जाहली का कसूर
एकांताचा, सहा ऋतूंचा, शाप यक्षास क्रूर
वृक्षाच्छादित, रामगिरीते, भोगितो शाप दूर
सीतास्नाने, पावन असे, जेथले ताल-नीर ।।१।।

पत्नीविरहे, दुःखमग्न, वाळला तो अतीव
महिने काही, व्यतित करिता, निखळले बाहुबंद
आषाढाच्या, दिवशी पहिल्या, पाहतो कृष्णमेघ
(जणू) गज मदाने, क्रीडा करी, माजुनि मस्त एक ।।२।।

दर्शन ज्याचे, लावी पिसे, धुंद प्रणयी जनांस
दुःखाsवेगे, हतबल होई, कौतुके पाही त्यास
रोखुनी अश्रू, मिटुनी डोळे, घेतसे खोल श्वास
आठव येता, प्रियबाहुंचा, जाहला तो उदास ।।३।।

उत्तरदिशी, गमन करितो, जाणुनी नीलमेघ 
क्षेमकुशल, प्रिये कळविण्या, कल्पना ये मनात
निर्जीव ढग तो, निरोप कथण्या, सर्वथा असमर्थ
(हे) नुरले भान, वाहून फुले, यक्ष वदला घनास ।।४।।

पुष्कराच्या, महासारसि, जन्म झाला तयाचा
देवेन्द्राचा, प्रिय सेवक तू, शांतवी तप्तभूला
पाहुनी तुला, अतिआनन्दे, सुस्वरे गाती ललना
ऐशा घना, नमन करुनी, विनवितो मी तयाला ।।५।।

कुबेरशापे, वनवासी मी, लोटले चार मास
प्रणयार्ता ती, प्रिया माझी, दीन कष्टी उदास
शिवशम्भूच्या, चन्द्रप्रकाशे, उजळते जी झकास
ऐशा अलका-नगरी जाउनि, सांगशी का निरोप? ।।६।।

वाटेमध्ये, भेटतील तुज, चातक आणि बगळे
पाहुनी तुला, विरहयातना, विसरती पथिक सगळे
गडगडाटे, बीजांकुर ते, उमलती धरतिवरती
घेउनि कमळे, हंस सोबती, परतति मानसरसि ।।७।।

श्रीरामाच्या, पदकमलांनी, जाहला जो पवित्र 
भेटीअंति, रामगिरीच्या, जो तुझा प्रिय मित्र
आलिंगुनी त्या, गिरीशिखरांना, मार्ग क्रमसि पुनश्च
तव अश्रूंचा, कर वर्षाव, भेट होता पुनश्च ।।८।।

मार्ग तयाला, देतो आखून, त्वरित तव सुप्रयाणा
विश्रांतीस्तव, गिरिशिखरे अन्, निर्झरे नीरपाना
हे जलदा तू, जलद जाउनि, सांग माझ्या सखिला
कर आश्वस्त, प्रियभार्येला, कळवुनि क्षेमकुशला ।।९।।


मेघदूताची पहिली १० कडवी व त्यांचा इंग्रजी अनुवाद इथे : http://www.youtube.com/watch?v=uHqm5b1tdXA व पुढील १० कडवी व त्यांचा इंग्रजी अनुवाद इथे: http://www.youtube.com/watch?v=cbpXLAa7glY  मिळेल.

मेघदूत : स्वैर भावानुवाद २ ची link:  http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/02/10-meghadoot-2.html