||श्री||
आधी एकदा मी सावरकरांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली होती. पण तो अर्धवट राहिला. त्यानंतर खरतर पोवाडा लिहिण्याच मनात होतं पण अचानक हे लिहिलं गेलं.
पूर्वी वाचलेल्या
पुस्तन्कांमधील गोष्टी आठवल्या त्याप्रमाणे ह्या ओव्या
लिहिल्या आहेत.
योग्य ठिकाणी योग्य ते खुलासे आणि संदर्भ यथावकाश देईनच.
एका बैठकीत लिहिल्यामुळे आत्ता आठवणाऱ्या महत्वाच्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न
केला आहे. त्यामुळे काही महत्वाच्या घटनांचा (उदा : थोरल्या बंधुंची अंदमानात भेट) उल्लेख राहून गेला आहे. तसेच समाजसुधारणा चळवळीबद्दल अजून लिहायला हवं.
वेळोवेळी ह्यात भर घालत राहीनच.
अत्यंत तपशीलवार चरित्रासाठी जिज्ञासूंनी श्री. वि . जोशी
ह्यांनी लिहिलेले 'क्रांतिकल्लोळ' वाचावे.
चाल: गुरुचरित्राच्या / नाथचरित्राच्या ओव्यान्प्रमाणे.
(लवकरच ध्वनिमुद्रण करून इथे post करीन.)
कविता सावरकरांची / सावरकर चरित्र
पहिल नमन श्रीगणेशाला
आणि मग भरतभूमिला
वंदितो त्रिवार ज्ञात - अज्ञात
स्वातंत्र्यदेविच्या उपासकांना ।।१।।
आज काय दिवस आले
जन ती आहुती विसरले
जनहो करून देतो आठवण
करा भक्तिभावे श्रवण ।।२।।
सांगतो कथा विनायकाची
महान त्या धुरंदराची
निर्भीड निश्चयी समाजसुधारकाची
स्वातंत्र्यवीर साहित्यिकाची ।।३।।
काय सांगू त्याचे गुण
शब्दात न होणे वर्णन
केवळ अतुलनीय अद्भुतरम्य
असे तयाचे जीवन ।।४।।
लहानपणीच घेतली शपथ
करीन मातृभूमीला स्वतंत्र
त्यासाठी केले संघटीत
मित्रमेळ्याते तरुण ।।५।।
शिक्षण घेतले पुण्यनगरीत
प्रख्यात फर्ग्युसन कॉलेजात
तिथेही ठेविले सुरूच
स्वातंत्र्यमन्त्राचे पठण ।।६।।
अखंड चालू चळवळ
केले शिवप्रभूचे स्तवन
विदेशी कपड्याची होळी
केली विनायकाने पुण्यात ।।७।।
होते नरकेसरीचे पाठबळ
घाबरवून सोडले पोलिसदळ
उभारले महाराष्ट्रभर
मित्रमेळ्याचे शाखादळ ।।८।।
जाऊन साहेबाच्या देशात
करू देशप्रेमिंचे संघटन
असा करून विचार
केले शत्रूनगरी प्रयाण ।।९।।
जाण्याआधी विनायकाने
घेतले मुंबापुरी संमेलन
अमोघ वक्तृत्वाने सर्व
लहानथोरास केले वश ।।१०।।
अभिनव भारत करून
मित्रमेळ्याचे नामकरण
स्वतंत्र भारताचे त्याने
पाहिले भव्य सपान ।।११।।
लंडनस्थित श्यामजी वर्मा
इंडिया हाउसचे सर्वेसर्वा
हिंदी तरुणांचे आश्रयदाता
आणि त्यांचे पुढारी ।।१२।।
होता विनायकाचे आगमन
बदलला लंडनचा नूर
सावरकर - वृत्तपत्रांची
नित्य शाब्दिक चकमक ।।१३।।
इतर देशीच्या क्रांतीचे
केले नीट परीक्षण
स्फूर्तीदायी अनुवाद
माझीनी-चरित्राचा ।।१४।।
भारतीय इतिहासाचा करून
सखोल पूर्ण अभ्यास
लिहिला ग्रंथ ऐतिहासिक
५७च्या युद्धाचा ।।१५।।
राहून शत्रूच्या गोटात
धाडिली शस्त्रे स्वदेशात
गनिमी कावा अवलंबून
बॉम्बनिर्मिती पसरविली ।।१६।।
तरुण सर्व 'बाटवले'
देशकार्यी एकवटले
ह्या सर्व कार्याचा कळस
म्हणजे मदन जाणावा ।।१७।।
इंग्रज झाले हैराण
पाहून विनायकाचे पुढारीपण
दिलीच नाही पदवी
जारी केले वॉरंट ।।१८।।
स्वतंत्र हिंदुस्थानचा ध्वज
फ्रान्सला जाऊन निर्मिला
कामाबाईंनी भरसभेत
जर्मनीत तो फडकाविला ।।१९।।
सेनापती काय बसे स्वस्थ?
विनायक आला परत
लंडनमध्ये ठेवता पाय
त्यासे झाली अटक ।।२०।।
खटला भरला साहेबाने
ठरले धाडावे हिंदुस्थाने
करून त्यास विशेष बंदी
जहाजावरी पाठविले ।।२१।।
पाहून सर्व नियोजन
करून शिवाजीचे स्मरण
धाडसी त्या विनायकाने
आखला बेत सुटकेचा ।।२२।।
जवळ येता मार्सेलिस
जातो सांगून शौचास
शूरवीर त्या गरुडाने
घेतली स्वान्तत्र्याची झेप ।।२३।।
करून खाडी पार
पोहोचला फ्रान्सच्या भूमीवर
पण हाय रे दुर्दैवा!
पैसा ठरला प्रबळ ।।२४।।
परत येता भारतात
खटला झाला साकार
शिक्षा दोन जन्मठेपिंची
विनायाकासे सुनाविली ।।२५।।
नाही डरला परंतु
विनायक तो महान
हसून मनी म्हणाला
पुरून तुम्हास उरीन ।।२६।।
काळ्या पाण्याच्या शिक्षेस्तव
नेले अंदमानी तयास
तिथे बारी ऑफिसर
कर्दनकाळ कैद्यांचा ।।२७।।
विनायक मोठा चतुर
करी बारी साहेबास निरुत्तर
केले कैद्यांना साक्षर
आणि कमला काव्यश्रुन्गार ।।२८।।
करून कैद्यान्ना संघटीत
निर्मिली लिपी सांकेतिक
असहकार - हरताळ - उपोषण
लढा हक्कांचा आरंभिला ।।२९।।
रोज कोलु नशिबी
कधी कधी अंधारकोठडी
चौदा वर्षे वनवास
श्रीरामापरी भोगिला ।।३०।।
जिथे मृत्यूही ओशाळला
सरकार काय करे सांगा
एका सुदिनी आली वार्ता
सुटका तयाची होतसे ।।३१।।
रत्नागिरीत स्थानबद्धता
समजून नवकार्याची घंटा
विज्ञान बुद्धिवाद कवटाळून
समाजसुधारणा आरंभिली ।।३२।।
पाहून हिंदुच्या ऐक्याचे स्वप्न
हिंदू महासभा निर्मून
केले समाजाला जागृत
अखंड भारत निर्मिण्या ।।३३।।
अखेर भारत झाला स्वतंत्र
परंतु करंटे सरकार
इंग्रजांचे पाळून धोरण
सिंहास पिंजर्यात कोंडिले ।।३४।।
अखेरपर्यंत लढणारा
शत्रूला बेजार करणारा
नंतर समाज सुधारणारा
धन्य तो विनायक ।।३५।।
प्रायोपवेशन करून
मृत्यूला कवटाळून
झाला अनंतात विलीन
एक तेजस्वी तपस्वी ।।३६।।
असा दूरदर्शी विचारवंत
असा देशप्रेमी सुधारक
असा कलावंत महामानव
पुन्हा होणे दुष्कर ।।३७।।
विनायकाची हि कहाणी
केव्हा होईल सुफळ?
साधण्या देशाचे हित
नित्य स्मरावा विनायक ।।३८।।
असे त्याचे जीवन-कर्म
नका जाऊ देऊ व्यर्थ
विनवी तुम्हा सुमेध
कळवळून हो श्रोतेहो ।।३९।।
-
सुमेध ढबू