नानाची टांग
विद्यापीठात (नेहमीप्रमाणेच) टवाळक्या करीत हिंडत असताना आमच्या हाती एक
अहवाल आला आणि जी मांजरीचा जीव घेते अश्या त्या उत्सुकतेने आम्ही तो चाळून
पाहिला, तेव्हा आमच्या असे लक्षात आले, कि आंतरजालावर
दुपार नामक जाहिरातपत्रातील गुप्तपीठ नामक सदर (त्याखालील प्रतिक्रिया
वाचण्यासाठी) नियमितपणे (पूर्वी) वाचणाऱ्यान्चा जो
एक विशिष्ट वर्ग तयार झाला होता, त्या वर्गाच्या
गळ्यातील ताईत बनून राहिलेले आपले सर्वांचे लाडके अनंतकोटी (करणारे)
ब्रह्मांडनालायक असे 'कला'कार, नकलाकार, आंतरराष्ट्रीय
कीर्तीचे प्रतिक्रियाकार रारापपू (राजमान्य राजश्री परम पूज्य) श्री.
ज्युनियरराव ब्रह्मेबुवा ह्यांना नानाची टांग
विद्यापीठातर्फे साहित्यातील विद्यावाचस्पती
(D.Lit.) हि पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्याचा घाट घालण्यात
येत असून, त्यासंदर्भात मान्यवर विद्वानांची (म्हणजे पुण्यातील ज्येष्ठ
नागरिकांची) ह्यासंदर्भातील मते मागवण्यात येऊन, त्यांच्या संकलनातून
जो अहवाल तयार झाला तोच तो हा अहवाल! ज्युनियर ब्रह्मेंच्या प्रतिक्रिया
अचानक गायब कश्या व्हायला लागल्या ह्याचे कोडे हा अहवाल हाती आल्यावर
(अलगद) उलगडले. ह्या पदवीबद्दल कुठूनतरी सुगावा लागल्यानंतर दुपारवाल्यांनी
(नेहमीप्रमाणेच) (चुकीचा) ध्वन्यार्थ घेऊन ज्युनियर ब्रह्मेंच्या
प्रतिक्रिया delete करायला सुरुवात केली असावी! असो!
ह्याचा एक फायदा मात्र असा झाला कि ज्युनियर ब्रह्मे ह्यांनी
चेहेरेपुस्तकावर आपल्या प्रतिक्रिया आणि काही काळानंतर
लिखाणही प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि
त्यांच्या प्रतिक्रियांना आणि लिखाणाला प्रतिक्रिया आणि दाद देणे सोपे
झाले.
तर अश्या ह्या ज्युनियर ब्रह्मेंना पदवी देण्यासंदर्भातील
मते / अभिप्राय / प्रतिक्रिया संकलित करून तयार झालेला अहवाल
आम्ही चाळल्याचे आम्ही पूर्वी नमूद केलेच आहे. त्यातीलच काही भाग येथे
आपण सर्वांसाठी देत आहे. ह्यातील विविध भाग विविध लोकांनी लिहिलेले आहेत.
------------------------------------------------------------------------------
ज्युनियर ब्रह्मे : पात्रपरिचय
शून्यातून विश्व निर्माण झाल्याचे कोणाला पटत
नसेल (पक्षी: हॉयल, नारळीकर प्रभृती मंडळी) तर
त्यांनी ज्युनियर ब्रह्मे ह्यांची (साहित्यिक) कारकीर्द पहावी. २२ जानेवारीच्या
एका अविस्मरणीय लेखाने साहित्यक्षेत्रात लेखनकलेचा एक परमोच्च बिंदू
गाठला, आणि त्या एकमेवाद्वितीय बिंदूचा भयंकर महा-स्फोट झाला, आणि त्यानंतर
हे अचाट, अनवट असे ब्रह्मांड निर्माण झाले!
सुरुवातीला केवळ प्रतिक्रियांच्या पुंजक्यांच्या रुपात
असणाऱ्या ह्या साहित्यातून एक नवा तारा उदयास आला, लेखमाला
देखील तयार झाल्या! अश्या ह्या ब्रह्मांडातील हे साहित्यिक
विश्व सतत प्रसरण पावतेच आहे (आणि ज्युनियर ब्रह्मे लेख प्रसवतो आहे).
ह्या महास्फोटामुळे उठलेले तरंग अजूनही आपणास अनुभवयास येतात.
तर अश्या ह्या ब्रह्मांडातील नवोदित तारा
कि जो ज्युनियर ब्रह्मे ह्याला सन्मानपूर्वक
पदवी देण्याचा प्रस्ताव पुढे आला असून त्यातील मानपत्रात लिहिण्यासाठी
त्याचा परिचय करून देण्याची विनंती आम्हास करण्यात आली आहे. इथे
खरं तर 'पात्र'परिचय म्हणणे जास्त संयुक्तिक ठरावे (का? ते
ज्युनियर ब्रह्मेंचा फोटो पाहिल्यावर लक्षात येईलच), किंवा
'पत्र'परिचय (कारण हे लिखाण पत्राने
पाठवण्यात येत आहे!). (आम्ही त्याच्या ‘सुंदर ते
ध्यान’ बद्दल लिहिणे हा म्हणजे ‘अहो रूपं अहो ध्वनिं’ असा प्रकार होऊ शकेल..
च्यायला! म्हणजे आम्ही गाढव!)
त्याचे एक पूर्वज 'चार हजारी' मनसबदार
होते असे ऐकिवात आहे. पण इथे त्याच्या घराण्याबद्दल जास्त माहिती
देणे संयुक्तिक ठरणार नाही. त्यासंदर्भात त्यालाच लेख लिहू देत. अश्या
लेखांबद्दल एखाद्या दिवाळी अंकाकडून त्याला मिळणाऱ्या चार हजार रुपये मानधनाच्या आड आपण कशाला या! त्याच्या साहित्यिक
कारकिर्दीचे अवलोकन करण्यासाठी आपण त्याच्या ह्या
(लेखन)कलेकडे वळूयात.
तर सांगायचा मुद्दा हा कि
पूर्वी बहुतांश चांगले खेळाडू आधी कसोटी क्रिकेट खेळायचे - रणजी
वगैरे. मग वन-डे खेळायला सुरुवात करायचे. त्यानंतर टी-२० सुरु झाल्यावर
टी-२० मध्येहि खेळायला लागले. पण ज्युनियर ब्रह्मे हा नवीन पिढीचे प्रतिनिधी
असल्याने आणि मुख्य म्हणजे ब्रह्मेच्या ब्रह्मांडात सगळं उलट असल्याने
ज्युनियर ब्रह्मे हा आधी टी-२० प्रमाणे दुपार
मध्ये गुप्तपिठामधील दळणावर प्रतिक्रिया लिहायला लागला. त्याच्या
विलक्षण प्रतिक्रिया वाचून लेख लिहिणाऱ्यांचे डोळे पांढरे होत असत.
अनेक लोक केवळ त्याची प्रतिक्रिया वाचायला म्हणून गुप्तपीठच्या पानाला
भेट देऊ लागले. तिथे अनेक नियमित प्रतिक्रियालेखक
आपल्या चौकार आणि षटकारांनी वाचकांचे मनोरंजन करीत असत.
पण तेथील प्रतिक्रियांचे पर्यवसन 'सह नौ प्रकटतु' कडून
हळूहळू 'सह नौ भुंकतु' (पक्षी: बालमोहन) व्हायला लागले.
त्याच सुमारास, ज्युनियर ब्रह्मे हा दूरदर्शी असल्याने (सगळेच ब्रह्मे
आहेत!) त्याने फे.बु.वर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने
छोटे छोटे लेख लिहून वन-डे कडे आपला मोर्चा वळवला, आणि मग एलीआत्याच्या
लग्नाची दीर्घकथा लिहून कसोटीचे मैदान देखील मारले. असे असले तरी त्याच्यातील प्रतिक्रियाकार
त्याने जपला आहे, ह्याची साक्ष फे.बु.वरील त्याच्या प्रतिक्रिया देतच असतात.
बाकी ज्युनियर ब्रह्मेबद्दल अजून काय
लिहिणार. त्याने स्वत:च स्वत:चा परिचय विविध
लेखांमध्ये देऊन ठेवला आहे. त्यावरून एक मात्र लक्षात येते कि हा एक कलासक्त
माणूस आहे.
बाकी ज्युनियर ब्रह्मे ह्याने अशीच लेखनकलेची (हा
समास षष्ठी तत्पुरुष किंवा द्वंद्व, कसाही
सोडवला तरी चालेल) सेवा करावी हीच आकाशातल्या बापाच्या चरणी प्रार्थना
! (ह्यांचा लेखनिक रविवारी येशुमन्दिरात जात असावा आणि शेवटच्या ओळीचा
शेवटचा भाग त्याने ह्यांना न सांगता लिहिला असावा असा आमचा अंदाज)
काही अभिप्राय / प्रतिक्रिया
१.
चांगलं लिहितो हा माणूस. ह्याचं लिखाण
म्हणजे अगदी फराळासारखं! पण शेजाऱ्यांच्या.
आमच्या घरचं काय सांगू. आमच्याकडे कलत्र करते फराळ. दर वर्षी
दिवाळीनंतर मला नवी कवळी करावी लागते. ते एक असो.
तर ह्याचं लिखाण म्हणजे अगदी फराळासारखं! वैविध्यपूर्ण.
चकल्यांसारखं खुसखुशीत, खुमासदार! विविध
प्रकारचे लेख लिहितो. ऐतिहासिक विनोदी, साहित्यिक
विनोदी, कौटुंबिक विनोदी, चावट विनोदी, नाटकी
विनोदी, रहस्यकथा, वैज्ञानिकांच्या कथा, चरित्रकथा, लग्नकथा
असे विवध प्रकारचे लेखन जोरात चालू आहे. एक बर
कि ह्याला अजून (साहित्यातल्या) कवितेचा छंद लागला नाहीये.
पण ह्याच्या काही गोष्टी म्हणजे जरा जास्तच होतात. विशेषतः
कलाबाई प्रकरण. जुन्या मराठी साहित्यात एका कलाबाई प्रकरणाने पुण्याची
झोप उडवली होती. (असे कुठेतरी वाचल्याचे अंधुक स्मरते) तसेच ह्याच्या कलाबाई प्रकरणामुळे देखील होणार का काय?
बाकी ह्याने लिहिलेल्या गोष्टी वाचल्या कि आमच्या दिवट्याचा चेहरा डोळ्यांपुढे उभा राहतो. त्याच्या ऑफिसातल्या एक एक गोष्टी कानावर येताहेत हल्ली. खरंखोटं देव जाणे. एकदा कान उपटून चौकशी केली पाहिजे. कधीकधी वाटतं कि स्वतःच्याच गोष्टी हा गधडा ज्युनियर ब्रह्मे नावाने लिहितोय कि काय! तेही एक असोच!
बाकी ह्याने लिहिलेल्या गोष्टी वाचल्या कि आमच्या दिवट्याचा चेहरा डोळ्यांपुढे उभा राहतो. त्याच्या ऑफिसातल्या एक एक गोष्टी कानावर येताहेत हल्ली. खरंखोटं देव जाणे. एकदा कान उपटून चौकशी केली पाहिजे. कधीकधी वाटतं कि स्वतःच्याच गोष्टी हा गधडा ज्युनियर ब्रह्मे नावाने लिहितोय कि काय! तेही एक असोच!
२.
काय पण एक नंबरचा भुरटा माणूस आहे. सगळी मेली नक्कल. थेट
पुलं ची नक्कल! तश्याच पद्धतीने लिहितो. तश्याच प्रकारच लिहितो. तश्याच
स्टोऱ्या लिहितो. बंगाली पात्र पण आणून ठेवलय स्टोरीमध्ये. एलीआत्याबद्दल
लिहून मधेच वुडहाउसचा टच!
कोणी गाढवाने ह्याला पदवी देण्याचा प्रस्ताव मांडलाय? गुप्तपीठ आणि मुक्त विद्यापीठ ह्यात गल्लत केली कि काय?
कोणी गाढवाने ह्याला पदवी देण्याचा प्रस्ताव मांडलाय? गुप्तपीठ आणि मुक्त विद्यापीठ ह्यात गल्लत केली कि काय?
(ह्यांच्या फे.बु. वरच्या लिखाणाला फारसे likes मिळत नसणार, असा
आमचा अंदाज)
३.
ह्याच्यावर ट्रेक-गुरूंचा फारच प्रभाव पडलेला
दिसतोय. अचानक डोंगरयानबद्दल फारच प्रेम उतू जायला लागलय!
ह्याचा प्रवास प्रतिक्रियाकार ते रतीक्रिडाकार
असा व्हायला लागला आहे.
(कोण आहे रे हा? बडवा ह्याला!)
४.
एकादशी का उपास था,
खायी मैने खिचडी,
अच्छा लिहिता है ज्युनियर,
दे दो उसको PhD
५.
तर ज्युनियर हा माझा नानावाड्यातल्या शाळेतला
विद्यार्थी! वर्गात मी असंबद्ध आणि तुटक तुटक शिकवत असताना ह्याचा लक्ष
मात्र कायम त्या शेजारच्या वर्गातील एका मुलीकडे असायचं. काय बर तिचा नाव? कला
कि असंच काहीसं होत. बाकी हा खूप मोठा प्रतीक्रीयाकार होणार हे मी तेव्हाच
ओळखला होत. बाकीची मुल धड्यांखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. हा
प्रतिक्रिया लिहून ठेवत असे. इतिहासाच्या पुस्तकात त्याच्या पूर्वजांच्या
ऐतिहासिक कथा, आणि विज्ञानाच्या पुस्तकात त्याच्या चुलतआजोबांचे
महात्म्य! एकदा मी अशीच वर्गात असंबद्ध आणि तुटक तुटक शिकवत होते.
तेव्हा हेडसर वर्गात आले. 'तुला कोणत्या कलेची आवड आहे बाळ?' असा प्रश्न
त्यांनी विचारला. त्यावर ह्याने 'शेजारच्या वर्गातील कला' अस
उत्तर दिलं. हेडसरांना तर चक्कर यायची बाकी होती. 'ही
मुलं ह्या वयात हे असले उद्योग करतात आणि तुम्ही वर्गात काय
करत असता?' असा प्रश्न विचारून त्यांनी माझी बदली केली.
६.
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
७.
कसली PhD अन कसलं काय! आमच्या अमेरिकेत हे असले फाजील लाड करत नाहीत लोकांचे. तुम्हा
लोकांना नसतं कौतुक ह्या असल्या भुरटयांच! मत मागवताहेत माझं. हि काय
निवडणूक आहे का? नुसता वेळेचा अपव्यय!
तळटीप: विद्यापीठांमधील इतर अनेक प्रपोजल्स
प्रमाणे हे प्रपोजल देखील सध्या धूळ खात पडून आहे.
विद्यापीठांमध्ये २ प्रकारची प्रपोजल्स बघावयास आणि ऐकावयास मिळतात
: धूळ खात पडून राहणारी, आणि निष्ठुर हृदयांची ओळख करून देणारी! दोन्ही
मध्ये साम्य हे कि सामान्यतः शेवटी पदरी निराशाच येते!
तळटीप २ : ज्युनियर ब्रह्मेंच्या सुरस आणि
चमत्कारिक कथा ऐकून लौकरच त्यावर 'ज्युनियर बी' ह्या
नावाने सुपरहिरोची मालिका काढण्याचा मनोदय भुकेश खन्ना ह्यांनी
व्यक्त केला आहे. अर्थातच सर्व ब्रह्में लोकांच्या भूमिका ते स्वतः करणार
आहेत!
No comments:
Post a Comment