Thursday, January 31, 2013

8. उखाणे (ukhane)


सध्या सगळीकडून लग्नांचेच विषय कानावर येत आहेत. आत्ता डिसेंबर आणि जानेवारी मधे ५ लग्नांची आमंत्रणं होती. पण मला त्यातल्या एकाच लग्नाला जाता आलं. बाकीची सगळी मी पुण्यात गेलो त्याच्या आधीच्या आठवड्यात किंवा मी पुण्यातून निघाल्यानन्तरच्या आठवड्यात होती. पण काही म्हणा, सध्या ह्या सारख्याच ह्या अश्या 'news' मिळत आहेत. प्रणव पण असल्याच काहीतरी बातम्या देतो आणि म्हणतो "अरे ढबू, काय सांगायच अरे, कोणीही भेटला कि अशीच काहीतरी बातमी कळते अरे.. लग्न नाहीतर साखरपुडा.. नाहीतर प्रकरण.. अगदीच काही नाही तर निदान लोकांची खटपट तरी चालू असतेच.." facebook वर सुद्धा लग्न नाहीतर साखरपुड्यांचेच फोटो असतात. असो. आता सध्या लग्नसराई चे दिवस संपले असले तरी लौकरच पुन्हा लग्नांच्या बातम्या सुरु होतीलच. सध्या senior लोकांच्या लग्नांच्या बातम्या आहेत. ह्या वर्षभरात आमच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींची लग्नं सुद्धा होतीलच (कदाचित एकमेकांशी सुद्धा.. :-p ). आता लग्न म्हणलं म्हणजे 'नाव घेणं' आलं. तर स्वतःचा हजरजबाबीपणा दाखवण्याच्या आणि सासरच्या मंडळींवर आपली छाप पाडण्याच्या ह्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात आमची मित्रमंडळी (आणि त्यांची मंडळी!) कमी पडू नयेत ह्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आम्ही इथे काही उखाणे सादर करीत आहोत. काही उखाण्यांना COEP ENTC च्या वर्गातले संदर्भ  आहेत. ते आणि इतर काही उखाणे अनाकलनीय वाटण्याची शक्यता आहे. पण उखाण्यामध्ये कशाचा कशाला काही संदर्भ असलाच पाहिजे असा काही नियम आमच्या तरी ऐकिवात नाही. नमुन्यादाखल १६ उखाणे दिले आहेत. काही उखाण्यांना आधुनिकतेची झालर देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रकारचे उखाणे आम्ही तयार करून देऊ शकतो. आम्ही 'personalized' उखाणे सुद्धा तयार करतो (उदा: उखाणा क्रमांक २, ५, १२). आपल्या व्यवसायाप्रमाणे किंवा शिक्षणाप्रमाणे देखील आम्ही उखाणे तयार करून देऊ (उदा: उखाणा क्रमांक १६). ENTC च्या लोकांसाठी ciruits वगैरे वर आधारित उखाणे देखील तयार करून मिळतील. वाचकांपैकी कोणासही कसलीही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. 


१. CD त CD Moserbaer ची CD
- - राव ओढतात संभाजी बिडी 


२. रोज संध्याकाळी - - ला देते missed call
आमची भेटण्याची जागा म्हणजे civil drawing hall


३. लग्नासाठी अट होती हवी Audi गाडी
- - रावांच नाव घेते नेसून नऊवारी साडी

४. दिवसभर करत बसतात MATLAB चे code
- - रावांच्या चेहेऱ्यावर उष्णतेचे फोड

५. माहेरच आडनाव - -, सासरच पार्ले
- - रावांना नाही आवडत तोंडलं आणि कारले

६. आकाशातून उल्का पडून झाले लोणार सरोवर
स्वप्नात दिसले - - राव पोहोताना मगरीबरोबर

७. माझ्या आजीने नाही चुकवली कधी पंढरीची वारी
- - राव खातात चहाबरोबर खारी

८. पुण्यामध्ये famous सुजाताची मस्तानी
- - माझा बाजीराव मी त्याची मस्तानी

९. team India चा captain महेंद्रसिंह धोनी
- - रावांची style म्हणजे मिशी आणि pony

१०. मंगळावरती यान पाठवते अमेरिकेची नासा
- - राव म्हणजे अगदी भित्रा ससा

११. - - राव रोज रात्री ढोसतात coke आणि beer
साधा mixer नाही होत दुरुस्त आणि म्हणे मी engineer

१२. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना
- - ला आवडते सोनाक्षी सिन्हा

१३. सशक्त भारत सशक्त महिला
- - च नाव घेते भरवताना घास पहिला

१४. दात स्वच्छ ठेवण्यासाठी भरते खळखळून चुळा
पहिल्याच भेटीत मला पाहून - - झाला खुळा

१५. processor i5, nvidia च card, 8 gb ची ram आणि 1tb ची sata
- - रावांच्या घशात अडकला पापलेटचा काटा

१६. software engineer चा उखाणा:
microsoft ने घेतली skype, महिंद्रा ने सत्यम
- - ने जिंकलं मन, करून भरतनाट्यम



बोनस : गणेश नावाच्या मुलाला एखादी मुलगी कशी propose करेल?
ऐलोमा पैलोमा गणेश देवा
माझ्याशी संसार कर करीन तुझी सेवा



Saturday, January 26, 2013

फुकटे grad students


Grad students सगळीकडे फुकट गोष्टी शोधत हिंडत असतात.. आणि सध्या तर दिवसच आहेत ते.. बायका जसं संक्रांतीच्या वगैरे हळदीकुंकवांना जाउन लुटून येतात तसं आम्ही सध्या career fairs मध्ये जाउन लुटून येतो.. भारतात जशी engineering नंतर placement होते तसा इथे नसतं. career fair मधे कंपन्यांचे बूथ असतात. तिथे जाउन resume द्यायचा. आणि मग कंपनी आणि तुम्ही बघून घ्या काय ते.. तर ह्या बूथ वर येणाऱ्या लोकांना कंपनी वाले काही ना काही देतातच diary वगैरे . अगदीच काही नाही तर पेन तरी देतात. त्यामुळे वर्षभराची सामुग्री जमवायला सगळी लोकं तिकडे हजेरी लावतात. परवा असाच एका बूथ वर laser pointer वालं पेन मिळालं. पुण्यात शंभर-दीडशे रुपये पडतात. परवा फुकट मिळालं :-D आता खरतर आमच काहीच काम नव्हतं तिथे, पण जर ती लोकं एवढी फुकट वाटायला बसलीच आहेत, तर मग का सोडा, म्हणून आम्ही गेलो होतो.

जगातली सगळ्यात मोठी फुकटखाऊ जमात कोणती असेल तर ती म्हणजे grad students ची. आमच्या इतके फुकटे लोक जगात नसतात. आता वाचणाऱ्या public पैकी काही जण नाही म्हणतील.. पण मनात मात्र ते हो च म्हणतील.  कुठेही फुकट खायला मिळणार असलं आम्ही सगळ्यात पुढे. university मधले fest आणि तत्सम प्रकारात जरा इकडे तिकडे नजर टाकली कि लग्गेच कळत. अर्थात काय करणार म्हणा मजबुरी आहे. आम्ही असलेल्या शहरातल्या किंवा आसपासच्या नातेवाइक किंवा ओळखीच्या मंडळींनी जेवायला बोलावण्याची आम्ही वाटच पाहत असतो! (मागच्याच आठवड्यात राजश्री कडे जाउन आलो).  त्यातून जर आपण राहत असलेल्या शहरात महाराष्ट्र मंडळ असेल तर गणेशोत्सव आणि दिवाळी म्हणजे पर्वणीच! एरवीसुद्धा वाढदिवस वगैरे म्हणजे मजा असते. 'दिल चाहता है' प्रमाणे 'केक खाने के लिये हम कहीं भी जा सकते है'. मुलींच्या वाढदिवसाला तर आवर्जून जायचं. केक कापून झाला कि त्या फोटो बीटो काढत बसतात. मग आपण केक, वेफर्स वगैरे वर ताव मारायचा. मुलांच्या वाढदिवसाला जाण्यात रिस्क असते. हाणामारी होते तिथे.

तर हे सगळ्यांच्या बाबतीत सारख असत. पण department प्रमाणे त्यात फरक पडतो. म्हणजे अस बघा कि biological sciences, humanities असल्या ठिकाणी happy hours वगैरे प्रकार असतो. तेव्हा खाणं पिणं फुकट असतं. (हो.. पिणं सुद्धा!! ) आता आमच्या इथे नवीन एक department झालय. त्यांना दर शुक्रवारी दुपारी जेवण आहे. अस असतं एकेका department च. पण सगळ्यात वाईट अवस्था म्हणजे EEE (electrical and  electronics ) आणि SCE (school of computer engineering) वाल्यांची असते. सगळा वेळ lab मध्येच असतात. आणि हे happy hour वगैरे काही प्रकार नसतात. एकतर lab मधल्या त्या cubicles मध्ये बसून माणसाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपून जातात. त्यामुळे त्याला संध्याकाळी घरी जाणं म्हणजेच एक आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे happy hour वगैरेची गरजच नाही काही! हुशार आहेत हि departments चालवणारे लोक. त्या खुराड्यात बसून माणूस संपून जातो. हो.. खुराडंच ते.. एक computer आणि एक खुर्ची ह्याला अशी किती जागा लागते.. SCE वाले लोक म्हणजे कोंबडयानसारखे असतात. मालक अधुन मधून कधीतरी खुराड्याकडे चक्कर टाकतो अंडं दिलय का (research paper साठी काही काम झालय का) ते बघायला.. आणि हो खरच लागू होते हि उपमा.. काही लोकं म्हणजे prof लोकांसाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात म्हणजे IEEE Transactions मध्ये paper वगैरे.. असो. जास्त ताणायला नको.. :-D

Friday, January 25, 2013

Soniya, अजब तुझे सरकार!




सोनिया, अजब तुझे सरकार!
भाट सभोती, पुत्र मंदमती, मूकबधीर 'प्रधान'!

कष्टकऱ्यांना दुर्मिळ दमडी, श्रीमंतांना मात्र सवलती,
wallmart ला पायघड्या अन कृषक विके घरदार!

जेवणात ना मिळे भाकरी, मद्यावरती मात्र subsidy,
रुपयाचा पण भाव उतरला, तरुण इथे बेकार!

मंत्री खाती कोटी रुपये, सामान्यांना पुरेत सहाशे?
वर्षाकाठी सहा cylinder सांग कसे पुरणार?

खादाड राजा spectrum वाटे, कलमाडीचे 'खेळ' चालले,
भ्रष्टाचारी अति माजले, जन होती लाचार!

हफीज, दाउद नामनिराळे, अफझलचे पण लाड चालले,
मुजाहिदीन ते स्फोट घडविती, RSS बदनाम!



मूळ गाणे: उद्धवा अजब तुझे सरकार
गीतकार:ग दि माडगुळकर
link : https://www.youtube.com/watch?v=fIDCS14uS94