आपण दर वर्षी श्रावणात देवघरात जिवतीचं चित्र पाहातो आणि कहाण्या ऐकतो. काल रात्रौ आम्ही त्या कहाण्या आठवण्याचा प्रयत्न करीत होतो आणि अशीच एक फारशी प्रचलित नसलेली कहाणी आम्हाला अचानक स्वप्नात आठवली. ती आम्ही आमच्या वाचकांपुढे सादर करीत आहोत.
आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचा नियम होता. सगळ्या सुनांनी PhD केली पाहिजे. PhD साठी मार्गदर्शक राजालाच केलं पाहिजे. लग्न झालं कि लगेच PhD सुरु होई. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगलं मार्गदर्शन करी. नावडत्या सुनेला तो फारसा भेटत नसे. आवडत्या सुना कामसू होत्या. नावडती सून थोडीशी आळशी होती. अशातच दोन वर्षं सरली. पण राजाच फारसं मार्गदर्शन लाभेना. आता तिला प्रश्न पडला. पुढे काय करावं? एक दिवस ती थोरल्या आवडत्या सुनेला भेटली. तिने तिला विचारालं, ‘बाई गं, काय करू? राजाची आवडती कशी होऊ?’ ती उत्तरली, ‘बाई गं, अनुभवावरून सांगत्ये, रोज सकाळी लौकर उठ, रोज भरपूर काम कर, अवांतर गोष्टी कमी कर, आळस करू नकोस, विषयाशी संबंधित वाचन वाढव. सगळ्या गोष्टी एकटीच करत बसू नकोस, अडेल तिथे इतरांची मदत घे. दर आठ दिवसांनी राजाला तुझ्या कामाबाबत माहिती देत राहा. प्रकृतीला जप. असं सगळं नीट कर. उतलि नाहीस, मातलि नाहीस, घेतला वसा टाकला नाहीस, तर अजून दोन वर्षांनी राजा नक्कीच खूष होईल, thesis लिही म्हणेल, परीक्षक पण खूष होतील.’ जसं नावडत्या धाकटीला काय करायचं ते कळलं, तसं तुम्हा आम्हा कळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी (defense अंती सत्राशे साठ उत्तरी!) सुफळ संपूर्ण होवो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना!