‘सिने कल्लाकारांची लफडी’ ह्या स्पर्धेत पाचशे रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालेल्या माणसाला त्याचे बक्षिसाचे पैसे देण्याची आश्वासने देऊन, परंतु पावतीवर आधीच त्याची सही घेऊन कोकसत्ताचा तरुण, तडफदार पत्रकार सुमार शेतकर सकाळी सकाळी कोकसत्ताच्या हापिसाकडे परत निघाला. जरी तो घाईत होता (तसा तो नेहमीच घाईत असे), तरी बाजूच्या घराच्या दारासमोर असलेल्या तीन दुधाच्या पिशव्या त्याने त्याच्या चाणाक्ष नजरेने टिपल्या. जात्याच कुशाग्र बुद्धीचा असल्याने ह्यामागे काही ‘व्यापक’ कारण असेल का असा विचार त्याच्या मनात आला. अर्थात तो तुमच्या आमच्यासारखा साधा नसल्याने, घरातली मंडळी चार दिवस गावाकडे गेली असतील आणि दूधवाल्याला सांगायला विसरली असतील, असा विचार त्याच्या मनात आला नाही.
स्वतःच्या नावाला जागून, ह्या साध्या प्रसंगातून काही सुमार दर्जाची बातमी किंवा लेख तयार होऊ शकेल का, हाच विचार त्याच्या मनात घोळत राहिला. हापिसात पोहोचताच त्याने दुधाच्या पिशव्यांबद्दल अर्धा कॉलम खरडला आणि कोकसाहित्य ह्या साहित्यिक कॉलमच्या संपादकाकडे पाठवून दिला. त्याने त्यावरून नजर फिरवली, आणि ‘ठीकठाक’ असा शेरा मारून काहीच नसताना वापरायच्या गठ्ठ्यात कागद सरकवला.
पुढे एक दिवस कोकसाहित्यच्या ‘नेहमीचे यशस्वी’पैकी कोणाचाच लेख वेळेत न आल्याने संपादकाने गठ्ठे चाळायला सुरुवात केली. त्यातून सुमारचा लेख उचलून त्याने ‘ह्यात बदल करून वापर’ असा निरोप देऊन उपसंपादकाकडे पाठवला. उपसंपादकाने त्यातला पहिला आणि शेवटचा परिच्छेद उडवला, तीन तीन ओळींची वाक्यं तयार केली, त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून लिहिलेला लेख बदलून ‘एका दुधवाल्याच्या नजरेतून’ असा बदल केला. हे सर्व उपद्व्याप करताना त्याने उदारपणे शुद्धलेखनाच्या चाळीसेक चुकादेखील घुसडल्या. असा कायाकल्प झालेला लेख दुसऱ्या दिवशी छापून आला, आणि स्वतःचाच लेख ओळखू न आल्याने सुमारने ‘माझी कल्पना चोरली’ असं म्हणत चार शिव्या हासडल्या.
दोन दिवसांनी कोकसत्ताच्या हापिसात एक पत्र आलं :
‘प्रति संपादक,
कोकसत्ता
सनविवि,
तुमच्या पेप्रात दुधवाल्याचा लेख वाचला. माझ्या रोजच्या गिऱ्हाकांपैकी एका ठिकाणी मला काही संशयास्पद वाटते आहे. ह्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो. पोलीस आमच्यासारख्या सामान्य लोकांकडे लक्ष देत नसल्याने मी अजून तरी पोलिसांकडे गेलेलो नाहीये. तुमच्या पेप्रात माझ्यासारख्याच एखाद्या सामान्य दुधवाल्याचा लेख परवा छापून आला, तेव्हा तुम्ही माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवाल अशी आशा आहे. पोरे भंगार ऐजन्सीवाल्यांच्या हापिसात रोमो विचारा, कुणीही सांगेल.
आपला नम्र,
रो मो
(रोहन मोरे)’
हे पत्र कोकसत्ताच्या वेगवेगळ्या विभागांमधून फिरून शेवटी सुमारच्या टेबलावर आले. त्याबरोबरच ‘फार पैसे खर्च न करता काही बातमी मिळतिये का बघ’ असा निरोप पण आला. सुमार लगेचच निघाला. पोरेंच्या हापिसात रोमोला भेटला. तिथे त्याला माहिती मिळाली कि रोमो सकाळी दूध टाकायला जातो आणि मग दिवसभर भंगारच्या दुकानात काम करतो. आम्ही दोघेही सारखेच’ असा एक प्रामाणिक विचार सुमारच्या मनाला क्षणभर चाटून गेला. पण त्याने तो बाजूला सारला. रोमो बाहेर गेला होता. तो आल्यावर सुमार त्याच्याबरोबर रानवारा सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्या इमारतीत गेला. ती दुमजली इमारत अगदी मोडकळीला आली होती. खालच्या मजल्यावर डाव्या बाजूला एक घर आणि उजव्या बाजूला एक छोटं दुकान होतं. तिथे वरच्या मजल्यावर जिन्याच्या दोन बाजूला दोन घरे होती. डाव्या बाजूचे घर बरीच वर्षे बंद असून वापरात नसल्याचे लक्षात येत होते. उजव्या बाजूच्या घराच्या दारावर खडूने ‘पाटील’ असं नाव लिहिलेलं दिसत होते. दारासमोर पाच दुधाच्या पिशव्या दिसत होत्या. व्हरांड्यातून कठडयावरून वाकून बघितल्यावर घरातलं आतलं फारसं काही दिसत नव्हतं.
‘हे पाटील कोण?’ सुमारने विचारले.
‘ते काही माहिती नाही. गेला एक महिना ते इथे राहताहेत. आमच्या दुधाच्या ऐजन्सीमधे येऊन एक बाई पाटील नाव आणि हा पत्ता देऊन गेल्या. हे घर माझ्या ऐरियात येतं, त्यामुळे माझ्याकडे फेरी लागली. रोज सकाळी एक लिटर दुधाची पिशवी बाहेर ठेवायची. दर दोन आठवड्यांनी येऊन त्या येऊन पैसे देऊन जाणार. आमची ऐजन्सी तशी महिन्याच्या महिन्याला पैसे घेते, पण नवीन गिऱ्हाईकाला सुरुवातीचे दोन महिने दर दोन आठवड्यांनी द्यावे लागतात. मी त्या माणसाला फक्त एकदाच पाहिलं आहे. आता ह्या वेळचे पैसे मिळतील का नाही काय माहिती..’
‘खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांना काही माहिती नाही का?’
‘नाही. पण घरातून काही सामान वगैरे कोणी नेलेलं नाहीये. दूध ठेवताना मी बघतोय, पाच दिवसांपासून घराला कुलूप आहे. हवं तर शिंदेंकडे विचार खाली ’
ते दोघे खाली आले. सौ शिंदेंना पण फारसं काही माहिती नव्हतं.
‘दिसायला देखणी असली म्हणून काय झालं, आम्ही पण माणसंच आहोत, आमच्याशी बोलल्यामुळे काय शायनिंग जाते का काय’ इति सौ शिंदे.
सरतेशेवटी एवढंच कळलं कि सुमारे एक महिन्यापूर्वी संध्याकाळी इथे एक जोडपं राहायला आलं. त्यांना किल्ली कुठून मिळाली वगैरे कोणाला काहीच माहिती नाही. घराची भाडेवसूली करणाऱ्या (बिल्डिंग मालकाच्या) माणसाला सुद्धा काहीच माहिती नव्हतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या साहेबांनी परस्पर कोणाच्या तरी हाती किल्ली दिली असावी. दोघेही कोणाशी काही बोलत नसत. पाटीलबाई निदान दुधाचे पैसे देणे किंवा इतर वाण सामान खरेदीला जायच्या, पाटीलबुवांनी तर कोणाशीच काहीच संबंध ठेवला नव्हता. ते दिवसभर घरीच असायचे. पाटीलबुवा बहुतेक काहीतरी लिखाण वगैरे करायचे, कारण पाटीलबाईंकरवी त्यांनी एकदा ‘तुमच्या टीव्हीमुळे दुपारी मला लिखाण करता येत नाहीये’ असा निरोप पाठवला होता.
‘ते दोघे शेवटचे केव्हा दिसले होते?’ सुमारने विचारले.
‘रविवारी. सहा दिवसांपूर्वी. संध्याकाळी कोणीतरी दोन माणसं जिना चढून जाताना दिसली. पहिल्यांदाच त्यांच्याकडे कोणी आलं होतं. थोड्या वेळानी ती दोन माणसं जिना उतरून गेलेली दिसली. मागचे पाच दिवस घर बंद आहे. कुलूप आहे. नुसताच दार लोटलेलं आहे.’
‘तुम्ही कोणी जाऊन बघितलं नाही का?’
‘आमचा काय संबंध. ते कधी धड बोलले पण नाहीत. बिल्डिंग मालक बघून घेईल.’
‘इतर काही माहिती?’
‘मला वाटतंय ते बहुतेक मराठी नव्हते. कानडी पाटील वगैरे असावेत. त्यांना आपापसात कधी बोलताना ऐकलं नाहीये कुणीच. पाटील बाई मोडक्या तोडक्या मराठी-हिंदी मधे बोलायच्या.’
‘अच्छा’
रोमोला थोडे पैसे देऊन सुमार हापिसात परत आला. आता इतक्या कमी माहितीवर काय बातमी लिहिणार. त्याने हा सगळं प्रकार संपादकांना सांगितला. ‘पोटातले जंत’ नावाचा अग्रलेख मागे घेतल्यामुळे आता प्राणीमित्र संघटनेपासून सुटका झाल्याच्या खुशीत ते होते. ते म्हणाले ‘चल, बातमी कशी तयार करायची ते तुला शिकवतो’. मग बंद दरवाज्याआड पुड्या ओढल्यानंतर सुमारला ह्या सगळ्या प्रकरणातील ‘व्यापक कटकारस्थान’ दिसले. संपादकांना इंग्रजी लेखांची भाषांतरे करून नवीन अग्रलेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. दुसऱ्या दिवशी कोकसत्ता मधे पुढील बातमी आली.
दुधाच्या पिशव्यांचे गूढ!
पाटील ह्यांच्या दरापुढे असलेल्या दुधाच्या पिशव्या सध्या चर्चेत आहेत. गेला एक महिना मोरो (नाव बदलेले आहे) रोज सकाळी त्यांच्या घराबाहेर दूध पिशवी ठेऊन जात असे. परंतु गेल्या पाच दिवसात पिव्या घरात घेतल्याचे दिसत नाही, त्या दाराबाहेरच. श्री व सौ पाटील ह्यांना गेल्या पाच दिवसांपासून कोणीही पाहिलेले नाही.
त्यांच्याबद्दल कोणालाही फारसे माहिती नाही. आमच्या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार पाटील हे त्यांचे खरे नाव नसावे. परिसरातील सर्वांनी त्यांना वाळीत टाकले होते. जास्त खोलात जाऊन चौकशी केल्यावर आमच्या प्रतिनिधीला असे कळाले आहे कि हा आंतरधर्मीय विवाहाचा प्रकार असावा. मुलीच्या घरून ह्या विवाहाला संमती नसल्यामुळे एकमेकांवर प्रेम करणारे हे जोडपे पळून जाऊन लग्न करून येथे राहायला आले होते. ह्या परिसरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांकडून त्यांना नियमितपणे धमक्या येत होत्या. मागच्या रविवारी संध्याकाळी एक टोळी येऊन त्यांना मारहाण करून गेली. त्यानंतर हे जोडपे पळून गेले असल्याची चर्चा सर्वत्र दाबक्या आवाजात चर्चा चालू आहे. सुजाण नागरिक आणि पोळीस ह्यात लक्ष्य घालतील का?
(बातमी जशी छापली होती, तशीच इथे दिलेली आहे. शुद्धलेखनाच्या चुकांशी आमचा काहीही संबंध नाही.)
सकाळी (हापिसच्या पैशांनी) चहा पिता पिता आपली बातमी वाचून खूष झालेला सुमार संपादकांच्या खोलीत गेला तेव्हा इतर पेपरचे बातमीदार इतकी सनसनाटी बातमी ‘मिस’ केल्याबद्दल बोलणी खात होते.
-------------
साधारण त्याच वेळी पण पाच दिवस आधी एक जोडपे ऊटी मधल्या रिसॉर्टमधे ‘ब्रेकफास्ट-इन-बेड’ करत होते. त्यांच्यातला पुरुष बाईला इंग्रजीत म्हणाला -
‘बघ डार्लिंग, तुला मी म्हणालो नव्हतो का कि काही दिवसांचाच प्रश्न आहे म्हणून. अगदी थोडेच दिवस राहावं लागेल छगनलालच्या त्या घरात. एकदा का कॉ ने आपल्याला सुरक्षितरित्या इथे आणण्याची सगळी तयारी केली कि मग झालं.’
--------------
ह्या सगळ्या प्रकरणात एक अर्बन नक्षल प्रोफेसर आणि त्याची विद्यार्थिनी कम गर्लफ्रेंड गेला दीड महिना फरार असल्याची बातमी कुठल्या कुठे मागे पडली.
(डोरोथी एल सेयर्स ह्यांच्या ‘द मिल्क-बॉटल्स’ ह्या कथेवरून)